
शहर विद्रुपीकरणाची चढाओढ
वाशी, ता.२९(बातमीदार) ः महापालिकेच्या येणाऱ्या निवडणुका बघता प्रसिध्दीसाठी नूतन वर्षाच्या अनुषंगाने नवी मुंबईत ठिकठिकाणी शुभेच्छा फलक लावण्याची चढाओढ इच्छुक उमेदवारांमध्ये लागली आहे. त्यामुळे शहरातील सर्वच नोड, दिशादर्शक फलक, विभागाच्या नावाच्या फलकांवर लागलेल्या बेकायदा जाहिरातींमुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे.
शहर विद्रूप करणाऱ्या बेकायदा जाहिरातींवर आळा घालण्याचे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, स्मार्ट सिटीचे वेध लागलेल्या नवी मुंबईत मात्र या आदेशाला सपशेल हरताळ फासल्याचे चित्र आहे. कारण या आदेशाची अंमलबजावणी करून घेण्यात खुद्द प्रशासनच अपयशी ठरले आहे. त्यामुळे फुकट्या जाहिरातबाजी करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. अशातच नूतन वर्षाच्या अनुषंगाने होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने चार दिवस आधीपासून राजकीय नेत्यांकडून बेकायदा जाहिरातबाजीला ऊत आला आहे. विशेष म्हणजे, विनापरवाना जाहिरातबाजी करणाऱ्यांवर कारवाईसाठी विभाग स्तरावर विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच महापालिकेची परवानगी न घेता होर्डिंग किंवा जाहिरात फलक लावणाऱ्यां विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखील दिले गेले आहेत. पण पालिका अधिकाऱ्यांमधील उदासिनतेमुळे फुकट्या जाहिरातदारांचे प्रताप सुरुच आहेत. ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, नेरुळ, बेलापूर व तुर्भे या भागात मोठ्या विनापरवाना जाहिराती लावण्यात आल्या आहेत. तसेच दिघा येथील साईबाबा मंदीर, ऐरोली रेल्वे स्टेशन या ठिकाणी सुद्धा मोठ्याप्रमाणात राजकीय पक्षांकडून जाहिरातबाजी करण्यात आली आहे.
------------------------------
राजकीय नेत्यांवर पालिकेची मेहेरनजर
कोपरखैरणेतील डी मार्ट चौकात, ऐरोली स्कॉय वॉक, सेक्टर १९ चौक, गोठीवली गावातील चौकात मोठ्याप्रमाणात होर्डिंग उभारण्यात आले आहेत. पालिकेचे अधिकारी तसेच अतिक्रमण पथक अशा बॅनरबाजीवर कारवाई करताना हात आखडता घेत आहेत. त्यामुळे बेकायदा फलक लावल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश असताना महापालिकेच्या विभाग कार्यालयाकडून मात्र राजकीय पदाधिकाऱ्यांच्या बेकायदा जाहिरातबाजीवर सोयीस्कररीत्या डोळेझाक केली जात असल्याचा आरोप रहिवाशांमधून होत आहे.
-------------------------------
नूतन वर्षाच्या अनुषंगाने राजकीय नेत्यांकडून परवानगी विनापरवानी बॅनरबाजी करण्यात येत आहे. पण पालिका आत्तापासूनच अशा बेकायदा जाहिराती हटवण्यासाठी विशेष मोहीम राबवणार आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे देखील दाखल करण्यात येतील.
-अभिजित बांगर, प्रभारी आयुक्त, नमुंमपा