
दमण बनावटीची दारू जप्त
कासा, ता. २९ (बातमीदार) ः दमण बनावटीची दारू वाहतूक करणारी कार सावरोली परिसरातून ताब्यात घेण्यात आली. यात कारसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केली.
नाताळ आणि नववर्ष साजरे करण्यासाठी पालघर जिल्ह्यात होणारी दमण बनावटीची दारू तस्करी रोखण्यासाठी केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाकडून केंद्रशासित प्रदेशाच्या सीमा भागावर गस्त घातली जात आहे. रात्रीपासून तलासरी तालुक्यातील धापचरी, सावरोली भागात उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पाटील पाडा रस्त्यावर सापळा रचला होता. इको कारची तपासणी केली असता कारमध्ये दमण बनावटीच्या दारूचे बॉक्स आढळून आले. बॉक्समध्ये विविध प्रकारचा दारूसाठा आणि कार असा ११ लाख ८१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे डहाणू निरीक्षक महेश धनशेट्टी, टी. पी. कुडकर, मानकर, के. धिंधले, पी. जे. राठोड, महेंद्र पाडवी, योगेश हरपले, सागर तडवी यांनी केली.