
दुभाजकमधील झाडांचा पालापाचोळा पदपथावर
कांदिवली, ता. २९ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिम येथील एस. व्ही. रोडच्या दुभाजकामधील काढण्यात आलेली झाडे चक्क पदपथावर टाकण्यात आली आहेत. महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या बाहेरच हा पालापाचोळा टाकल्याने याचा त्रास रुग्णांसह नातेवाईक आणि प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने दुभाजकामधील सुशोभीकरण करण्यात येते. काही वर्षांपूर्वी झाडे लावून सुशोभीकरण करण्यात आले होते. दुभाजकामधील सर्व झाडे काढून नव्याने झाडे लावून सुशोभीकरण करण्यात येत आहे. पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामात काढण्यात आलेली जुनी झाडे. बाजूलाच असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या पदपथावर टाकण्यात आली आहेत. पदपथाला लागूनच रुग्णालयाची भिंत आहे. या भिंतीवर सुशोभीकरण करून चित्रांद्वारे समाजोपयोगी संदेश रंगवण्यात आले आहेत. टाकण्यात आलेल्या या झाडांमुळे संदेश झाकले जात आहेत. शिवाय, रुग्णालयात येणाऱ्या शेकडो रुग्णांसह नातेवाईक व नागरिकांना पदपथ सोडून रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. रस्त्यावर दुचाकी व रिक्षा उभ्या असतात तसेच वाहनांची सातत्याने वाहतूक असल्याने प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पदपथ तातडीने मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सध्या मी रजेवर आहे. तरीही संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना सांगून पदपथ मोकळा करून घेतो.
- सचिन पारखे, उद्यान अधीक्षक, आर दक्षिण