
पंधरा कोटी रुपयांच्या कर्जाच्या आमिषाने बिल्डरची फसवणुक
बेस्टचालकाला मारहाण करणाऱ्या तरुणाला अटक
अंधेरी (बातमीदार) ः बेस्ट चालकाला बेदम मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ओवेश शकील अन्सारी (वय २२) यास बांगुरनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. बेस्टचालक आनंद तंतरपाळे रविवारी (ता. २५) नितीन कांबळे यांच्यासोबत कामावर होते. रात्री त्यांची बस प्रवाशांना घेऊन मालाडमधील लिंक रोड सिग्नलजवळ येताच एका तरुणाने बस चालवण्यावरून त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात त्याने त्यांना बेदम मारहाण केली होती. त्यात त्यांच्या हाताच्या करंगळीला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांच्या जबानीवरून पोलिसांनी ओवेशविरुद्ध मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली.
६५ लाखांच्या अपहारप्रकरणी
पाच जणांविरुद्ध गुन्हा
अंधेरी (बातमीदार) ः व्यवसायवाढीसाठी १५ कोटींच्या कर्जाचे गाजर दाखवून एका बिल्डरची सुमारे ६५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध बोरिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. पळून गेलेल्या सर्व आरोपींचा शोध सुरू आहे. राजेश नायर, महेश कदम, विशाल साळवी, संजीव सिंग आणि हुसैन अशी पाच जणांची नावे आहेत. कांदिवली परिसरात राहणारे सोहनलाल जैन व्यवसायाने बिल्डर आहे. त्यांना व्यवसायासाठी कर्जाची गरज होती. एका परिचित व्यक्तीने त्यांची राजेश नायरशी ओळख करून दिली होती. राजेशने त्यांना दहा कोटींचे कर्ज देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्याने त्याच्या सहकाऱ्याच्या मदतीने त्यांच्याकडून २५ लाख रुपये घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांना कर्ज मिळवून दिले नाही. टोळीने कर्ज देण्याच्या आमिषाने जैन यांची ६५ लाखांची फसवणूक केली. त्यांनी बोरिवली पोलिसांत तक्रार केल्यानंतर राजेशसह इतर पाचही आरोपींविरुद्ध अपहाराचा गुन्हा नोंदवण्यात आला.