पश्चिम रेल्वेची वाहतूक धुक्यामुळे विस्कळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पश्चिम रेल्वेची वाहतूक धुक्यामुळे विस्कळीत
पश्चिम रेल्वेची वाहतूक धुक्यामुळे विस्कळीत

पश्चिम रेल्वेची वाहतूक धुक्यामुळे विस्कळीत

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ : पश्चिम रेल्वेमार्गावरील वलसाड ते बोईसरदरम्यान दाट धुक्याची चादर पसरल्याने गुरुवारी (ता. २९) सकाळी रेल्वे वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते. धुक्यामुळे मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले. उशिराने धावणाऱ्या मेल-एक्सप्रेस गाड्यांमुळे लोकल सेवेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम दिसून आला आहे. लोकल १० ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.

गेल्या काही दिवसंपासून थंडीचे प्रमाण वाढले असून दाट धुक्यामुळे रेल्वेवाहतुकीला सतत फटका बसत आहे. वलसाड ते बोईसरदरम्यान गुरुवारी मध्यरात्रीपासून दाट धुक्याची चादर पसरली असून त्याचा परिणाम पश्चिम रेल्वे वाहतुकीवरही दिसून आला. धुक्यामुळे मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसहून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्या निर्धारित वेळेपेक्षा २० ते ३० मिनिटे विलंबाने धावत होत्या. उपनगरीय मार्गावर त्या वळविण्यात आल्याने लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले. परिणामी सकाळी १५ ते २० मिनिटे लोकल उशिराने धावत असल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

गोरेगाव-चर्चगेट लोकल सलग तीन दिवस रद्द
मालाड (बातमीदार) ः सलग तीन दिवस सकाळी ९.५३ वाजता सुटणार गोरेगाव-चर्चगेट लोकल रद्द केल्याने गुरुवारी प्रवासी संतप्त झाले होते. २७ ते २९ डिसेंबर असे सलग तीन दिवस कोणतीही पूर्वसूचना न देता लोकल रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. महिला प्रवासी आणि विद्यार्थीही त्रस्त झाले होते. संतापलेल्या प्रवाशांनी गोरेगाव रेल्वेस्थानक अधीक्षकांची भेट घेऊन त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.