पोलीस सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलीस सज्ज
पोलीस सज्ज

पोलीस सज्ज

sakal_logo
By

‘थर्टी फर्स्ट नाईट’साठी बंदोबस्त टाईट!
सुरक्षेसाठी ४० हजार पोलिसांचा फौजफाटा

अंधेरी, ता. २९ (बातमीदार) ः ‘थर्टी फर्स्ट’ नाईट साजरी करण्यासाठी एकीकडे मुंबईकरांनी जय्यत तयारी केली असताना शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसही सज्ज झाले आहेत. शहरात सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या मदतीला वाहतूक पोलिस, सशस्त्र दल, दंगल नियंत्रण पथक, गुन्हे शाखा, बीडीडीएस विशेष पथक, राज्य राखीव दल आणि जलद प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून पोलिसांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सुमारे ४० हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी असतील.

पाच सहपोलिस आयुक्त, सात अतिरिक्त आयुक्त, २५ उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ निरीक्षक, निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षकासह अंमलदारांचा समावेश पथकात आहे. स्वतः पोलिस आयुक्त बंदोबस्ताची पाहणी करणार आहेत. बंदोबस्तात हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा आदेशच पोलिस आयुक्तांकडून जारी करण्यात आला आहे. मुंबईत संभाव्य अतिरेकी हल्ल्याचा धोका पाहता शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य ती दखल घेतली आहे. नवीन वर्षाचे स्वागत शांततामय परिस्थितीत करता यावे म्हणून मुंबई पोलिस सज्ज झाले आहे.

या ठिकाणी ‘लक्ष’
- शहरातील विविध रेल्वेस्थानके, शासकीय-निमशासकीय इमारती, मंदिर, गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, मढ, गोराई चौपाटी, पवई तलाव इत्यादी गर्दीच्या ठिकाणी, धार्मिक ठिकाणे, राजकीय नेत्यांचे पुतळे आणि मॉलमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्या ठिकाणी सीसीटीव्हीद्वारे निगराणी करण्यात येणार आहे.
- समुद्रकिनारी लाखोच्या संख्येने मुंबईकर नवीन वर्षांच्या स्वागतासाठी येत असल्याने तिथे जास्तीत जास्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून घातपातविरोधी तपासणी अन् समुद्रकिनारी बोटीच्या सहाय्याने गस्त घालण्यात येणार आहे.
- महत्त्वाच्या ठिकाणी विशेष नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन आणि शहरातील हॉटेल, लॉज अन् गॅरेजची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे.

छेडछाडविरोधी पथकाची नियुक्ती
१. मद्यप्राशनानंतर होणारे वाद, महिलांची छेडछाड आणि विनयभंगाच्या घटना रोखण्यासाठी विशेष पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला छेडछाडविरोधी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
२. मद्यप्राशन करून वाहन चालविणे, रॅश ड्रायव्हिंग करणे इत्यादी घटना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तळीरामांविरुद्ध सक्त कारवाई करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहे. त्यासाठी जागोजागी नाकाबंदी करण्यात येणार आहे.
३. मुंबईकरांनी पोलिसांना सहकार्य करावे. शक्यतो पोलिसांना हस्तक्षेप करण्यास भाग पाडू नये, अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली आहे.

अवैध दारूची तस्करी रोखणार
अवैध दारूची तस्करी रोखण्यासाठी नवीन वर्षाच्या स्वागताच्या आणि हॉटेलमधील पार्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्काची करडी नजर असणार आहे. हॉटेलच्या टेरेसवर मोठ्या प्रमाणात पार्ट्या रंगतात. मात्र, विनापरवानगी पार्ट्यांना मनाई करण्यात आली आहे. नवीन वर्षात मोठ्या प्रमाणात बनावट मद्य आणि अवैध दारूची तस्करी होते. त्यासाठी संबंधित विभागाला योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. मढ, मार्वे, गोरेगाव संजय गांधी उद्यान, दहिसर आदी परिसरात मोठ्या प्रमाणात रात्री पार्ट्या चालत असल्याने तिथे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नवीन वर्षांत विविध ठिकाणी कार्यक्रम करणाऱ्या आयोजकांनाही योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे वाहतूक पोलिसांनी ‘ड्रक ॲण्ड ड्राईव्ह’विरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. मुंबईकरांना कुठल्याही प्रकारे समस्या असल्यास त्यांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.