
संत्री मोसंबीच्या दरात वाढ
डोंबिवली, ता. ३० (बातमीदार) ः आवक घटल्याने संत्री, मोसंबीच्या दरात वाढ झाली आहे. नोव्हेंबर ते डिसेंबरपासून बाजारात देशी संत्री, मोसंबी दाखल होण्यास सुरुवात होते. सौम्य हिवाळ्याच्या प्रदेशातील संत्री अधिक गोड असतात, पण थंडीच्या प्रदेशात ती आंबट लागते. त्याला जास्त आर्द्रतेची गरज असते. मार्केटमध्ये लहान, मध्यम, मोठा अशा पद्धतीने तीन प्रकारांत संत्र्यांची प्रतवारी होते.
मद्रासची मोसंबी ही आकाराने मोठी व चवीला आंबट असते. अशी मोसंबी जास्तीस्त जास्त रसाकरीता वापरली जाते. मात्र, नागपूरची गोड मोसंबी नागरिक आवडीने खात असतात. त्यामुळे नागपुरी संत्री, मोसंबीला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे, असे फळ विक्रेता बबन पावटे यांनी सांगितले. संत्री-मोसंबीची आवक घटल्याने दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. संत्रीच्या दरात १०० ते २०० रुपयांची वाढ झाली असून आधी ८०० ते १३०० रुपये, तर आता ९०० ते १५०० रुपयांना उपलब्ध आहे; तर मोसंबीच्या दरात ३० ते ४० रुपयांनी वाढ झाली आहे. प्रतिकिलो ७०-८० रुपये मिळणारी मोसंबीची आता ९० ते १३० रुपयांना विक्री होत आहे.