
विक्रमगडचे फार्महाऊस सज्ज
विक्रमगड, ता. ३० (बातमीदार) ः वर्षाखेरीचा उत्साह दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ओसंडून वाहत आहे. त्यामुळे येथील विविध पर्यटनस्थळे व फार्महाऊस मुंबईतील पर्यटकांनी शुक्रवारपासूनच भरू लागली आहेत. ऐन वेळेवर येणाऱ्यांसाठी येथे जागही उपलब्ध नसल्याचे सध्या दिसत आहे.
विक्रमगड, जव्हार, मोखाडा हा ग्रामीण भाग निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. शुद्ध हवा, स्वच्छ वातावरण मिळत असल्याने मुंबईतील पर्यटकांचा या स्थळांकडे ओढा असतो. विक्रमगडमध्ये अंदाजे ३० ते ३५ फार्महाऊस आहेत. तसेच, ५ ते ६ ॲग्रो टुरिझम रिसॉर्ट आहेत. थर्टीफर्स्ट हा जुन्या वर्षाचा शेवट आणि नव्या वर्षाचे आगमन साजरे करण्यासाठी महत्वचा दिवस मानला जातो. त्यामुळे पर्यटक अशा ठिकाणी येऊन हा दिवस साजरा करणे पसंत करतात.यावेळी मांसाहारी जेवण, मद्य यांना पर्यटक प्राधान्य देतात. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ग्रामीण पोलिस सज्ज झाले आहेत. जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.