तब्बल २८ वर्षांनी हत्येची उकल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तब्बल २८ वर्षांनी हत्येची उकल
तब्बल २८ वर्षांनी हत्येची उकल

तब्बल २८ वर्षांनी हत्येची उकल

sakal_logo
By

भाईंदर. ता.३० (बातमीदार) : अठ्ठावीस वर्षांपूर्वी काशी मिरा भागात राहणारी महिला व तिची चार मुले अशा एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली होती. ही हत्या करुन फरार झालेल्या आरोपीला मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी तब्बल २८ वर्षांनी मुंबई विमानतळावरुन गुरुवारी (ता.२९) अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचाही शोध सुरु आहे.

१९९४ मध्ये पेणकर पाडा येथे रहाणाऱ्या जगरानीदेवी प्रजापती (वय २७) या महिलेचे शेजारी रहाणाऱ्याया अनिल सरोज, सुनील सरोज व काल्या ऊर्फ राजकुमार चौहान या तीन जणांशी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन या तिघांनी जगरानीदेवी यांच्या घरात घुसून त्यांच्यासह त्यांची मुले प्रमोद (वय ५), पिंकी (वय ३), पिंटू (वय २) व लहान तीन महिन्यांचा मुलगा अशा पाच जणांची चाकू व चॉपरने हत्या केली होती. हत्येत वापरलेली शस्त्रे व रक्ताने माखलेले कपडे घरात लपवून तिनही आरोपी फरार झाले होते. हे सर्व आरोपी मुळचे उत्तर प्रदेश येथील राहणारे होते. या आरोपींचा अनेक वर्षे शोध न लागल्याने गुन्ह्याचा तपास थंडावला होता. २०२१ मध्ये पोलिसांच्या गुन्हे शाखेने या गंभीर प्रकरणाचा पुन्हा तपास सुरु केला.

पोलिस हवालदार पुष्पेंद्र थापा यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन पोलिस पथकाने उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे वीस दिवस मुक्काम ठोकला. त्यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलासोबत तपास केल्यानंतर यातील आरोपी राजकुमार चौहान हा परदेशात कामाला असतो व अधूनमधून मूळ गावी येत असल्याची माहिती मिळाली. अधिक तपासात आरोपी कतार येथील एका कंपनीत काम करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा पासपोर्ट क्रमांक शोधून काढला आणि आरोपी विरोधात लूक आऊट नोटीस जारी केली.

२९ डिसेंबरला राजकुमार मूळ गावी जाण्यासाठी कतारहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला. मात्र, त्याच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी झाली असल्याने विमानतळ अधिकाऱ्यांना त्याची माहिती होती. त्यामुळे इमिग्रेशन अधिकाऱ्‍यांनी आरोपीला थांबवून ठेवले व त्याची माहिती काशीमिरा पोलिस ठाण्याला दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि अन्य दोन आरोपींचा शोध सुरु आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबूरे यांनी दिली. याप्रकरणी पोलिस निरिक्षक अविराज कुराडे व त्यांच्या पथकाने यशस्वी तपास करुन तब्बल अठ्ठावीस वर्षांनी आरोपीला अटक केल्याबदाल त्यांचे कौतुक केले जात आहे.