
लग्नास नकार दिल्याने तरुणीवर चाकूहल्ला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : दिंडोशी परिसरातून एक भयंकर घटना समोर आली आहे. लग्नास नकार दिला म्हणून २४ वर्षीय तरुणीवर तरुणाने चाकूहल्ला केला आहे. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी (ता. २९) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. मुंबईतील शताब्दी रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून दिंडोशी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. राजेंद्र परब असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित तरुणी व आरोपी एकाच परिसरात राहतात. दोघांमध्ये पूर्वी मैत्रीपूर्ण संबंध होते. काही दिवसांनी त्यांच्या मैत्रीत दुरावा आला. ती आपल्यासोबत बोलत नसल्याने राजेंद्र याला राग अनावर झाला होता. गुरुवारी ती कामावरून घरी परतत होती. दुर्गावाडी चाळ, देवीपाडा नॅशनल पार्कजवळ आली असता त्याने तिची वाट अडवली आणि लग्नाची मागणी घातली. तिने नकार दिल्याने आरोपीने तिच्या गळ्यावर व हातावर चाकूने वार केले. दिंडोशी पोलिसांनी आरोपी राजेंद्रविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आहे.