
कंटेनरच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू
भिवंडी, ता. ३० (बातमीदार) : मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला. यात एका दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. हे पती-पत्नी भांडुप येथून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जात असल्याचे समजते. त्यांच्यासोबत त्यांची सहा वर्षांची मुलगी होती. ती या अपघातात वाचली आहे.
मनोज (वय ३६) आणि मानसी जोशी (वय ३४) हे दाम्पत्य भांडुप येथील रहिवासी होते. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी ते साईबाबाच्या दर्शनाला जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्यासोबत तानाजी वाडी येथील काही रहिवासी दुचाकींवर तर काही मिनी बसने शिर्डीला जाण्यासाठी सकाळी साडेसात वाजताच निघाले होते. मनोज व मानसी त्यांची सहा वर्षांची मुलगी मृण्मयी हिला घेऊन त्यांच्या दुचाकीवर निघाले होते. ते मुंबई-नाशिक महामार्गावर आले असता नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. यामुळे दोघे कंटेनरच्या मागच्या चाकाखाली सापडले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. सहा वर्षांची मृण्मयी विरुद्ध दिशेला फेकली गेल्याने तिला कोणतीही दुखापत झाली नाही. पोलिसांनी कंटेनर चालक कपिल देव याला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला.