
कल्याण-डोंबिवलीतील रस्ते सुधारणार
शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३१ : कल्याण-डोंबिवलीकरांची वाहतूककोंडी, रस्त्यांची दुरवस्था या जाचातून सुटका करण्यासाठी रस्त्यांची कामे मार्गी लावण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. पालिका प्रशासन आणि एमएमआरडीए अंतर्गत शहरातील साधारण ३६ रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. केडीएमसीतील २७ रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे काम पालिका प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. वर्षभरात ही रस्त्यांची कामे मार्गी लावण्याकडे पालिका प्रशासनाचा कल असून, नव्या वर्षात सुस्थितीतील रस्त्यांची भेट शहरवासीयांना मिळू शकते. पाचपैकी आंबिवली टिटवाळा रेल्वे स्थानकादरम्यान उड्डाण पुलाची उभारणी पुढील वर्षात पूर्ण होणार आहे.
एमएसआरडीसी, एमएमआरडीए यांच्या माध्यमातून शहरातील अनेक रस्त्यांचे सिमेंट-काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले गेले आहे. केडीएमसी हद्दीतील अंतर्गत रस्त्यांकडेही लक्ष देण्यात आले असून, पाच कोटीच्या आतील कामे पालिका प्रशासन आणि वरील खर्चाची कामे ही एमएमआरडीएच्या माध्यमातून केली जाणार आहेत. यामध्ये मुख्यतः डोंबिवलीतील रस्त्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. केडीएमसीचे मुख्यालय कल्याणमध्ये असल्याने विकासकामांमध्ये कल्याणला प्रथम प्राधान्य देण्यात येते, स्मार्ट सिटी अंतर्गत कामे देखील कल्याणमध्ये अधिक सुरू असल्याने डोंबिवलीकरांना झुकते माप दिल्याची ओरड केली जात होती. हा ठपका पुसण्यासाठी रस्ते कामात डोंबिवलीला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.
शहरातील अंतर्गत रस्त्यांची कामे
पालिकेची आर्थिक स्थिती ठीक नसल्याने पाच कोटींच्या आतील रस्त्यांची विकासकामे पालिका प्रशासनाने हाती घेतली आहेत. ४१.४४ कोटींची नऊ रस्त्यांची ही कामे असून, यात कोपरगाव, आजदेगाव, सुनील नगर येथील अंतर्गत रस्ते तसेच पिसवली, गोलवली, भाल, दावडी, भोपर संदप येथील रस्त्यांचा समावेश आहे; तर पाच कोटींवरील खर्चाची कामे हे एमएमआरडीए अंतर्गत करण्यात येणार असून, यामध्ये २७ रस्त्यांचा समावेश आहे.
उड्डाण पुलांची उभारणी
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सहा उड्डाण पुलांची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये आंबिवली-टिटवाळा स्थानकादरम्यान रेल्वे फाटकाऐवजी उड्डाण पूल उभारण्यात येत आहे. ५० कोटींचा हा प्रकल्प असून यातील ४५ टक्के काम आत्तापर्यंत पूर्ण झाले आहे. ऑक्टोबर २०२३ अखेरीस हे काम पूर्ण करण्याचे लक्ष प्रशासनाने ठेवले आहे. त्यासोबतच आंबिवली स्थानकाजवळील रेल्वे फाटक येथे उड्डाण पूल अथवा भुयारी मार्ग, कल्याण-मोहणे रस्त्यावरील उल्हास नदीवरील जुन्या दगडी आर्च पुलाशेजारी नवीन पूल उभारणे, कल्याण-मुरबाड रोड, कल्याण- बदलापूर रोड यांना जोडणारा वालधुनी नदी समांतर २४ मी रुंद विकास योजना रस्ता रेल्वे उड्डाण पूल व उन्नत मार्गासह विकसित करण्यात येणार आहे.
रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा
कल्याण-डोंबिवलीतील रस्ते हे अरुंद असल्याने त्यांचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्याचे काम पालिका प्रशासनाने तीन चार वर्षांपूर्वीपासून हाती घेतले आहे. रस्ते बाधितांचे पुनर्वसन हा मोठा प्रश्न पालिका प्रशासनासमोर होता. पालिकेची आर्थिक स्थिती डळमळीत असल्याने बीएसयुपी योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारला द्यावा लागणारा हिस्सा पालिकेकडे नव्हता. सरकारने पालिकेला अदा करावी लागणारी रक्कम माफ केल्याने हा तिढा सुटला असून, रस्ते कामात असलेला मोठा अडसर दूर झाला आहे.
अमृत पाणीपुरवठा योजना
२७ गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पालिकेतर्फे अमृत पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. १९१.८४ कोटी रुपये खर्चाच्या या योजनेंतर्गत जलवाहिन्या टाकणे, जलकुंभ उभारणे ही कामे केली जात आहेत. या अंतर्गत २८ जलकुंभ गावात उभारण्यात येणार आहेत, त्यातील २१ जलकुंभाची जागा ताब्यात घेण्यात आली असून उर्वरित सात जलकुंभाची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. १६ जलकुंभाचे आरसीसी काम प्रगतिपथावर असून, उर्वरित पाच जलकुंभाचे डिझाईन मंजुरी कामासाठी प्रलंबित आहेत. भूस्तर जलकुंभाचा देखील प्रस्ताव असून त्यासाठी जागा मिळावी हा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. मार्च २०२३ पर्यंत या कामांची डेडलाईन आहे, परंतु जागा मिळविणे व काम करणे यात स्थानिक अडचणी येत असल्याने डिसेंबरपर्यंत पालिकेने मुदतवाढ मागितली आहे. वर्षाअखेरीस या योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे.
कल्याण रिंग रोड
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्प एमएमआरडीए व केडीएमसी यांच्यावतीने सुरू आहे. काटई बदलापूर रस्त्यावरील हेदुटणे गावापासून ते टिटवाळा राज्य मार्गापर्यंत एकूण सात टप्प्यामध्ये कल्याण रिंग रोड तयार केला जात आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत कामे
स्टेशन परिसर सुधारणा, ११०० मी लांबी व १८ मी रुंदीचा उड्डाण पूल, एसटी डेपो पुनर्बांधणी, वाहनतळ, वाणिज्य संकुल उभारणी, बस डेपो लगतचा नाला बंदिस्त करून नाल्यावर वाहन पार्किंग व्यवस्था करणे, स्टेशन परिसरात वाहनतळ, फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन, सीसी टीव्ही, पादचारी पुलावर प्रवाशांच्या सोयीकरिता स्वयंचलित जिने बसविणे आदी कामे करण्यात येणार आहे. ऑक्टोबर २०२३ पर्यंत ही कामे पूर्ण होणार आहेत.