ठाणेकरांना दिसणार शहराचा स्मार्ट बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणेकरांना दिसणार शहराचा स्मार्ट बदल
ठाणेकरांना दिसणार शहराचा स्मार्ट बदल

ठाणेकरांना दिसणार शहराचा स्मार्ट बदल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : खड्डेमुक्त रस्ते आणि स्वच्छ सुंदर शहर असा ठाण्याचा चेहरामोहरा बदलणारा कायापालट ही ठाणेकरांसाठी २०२३ मधील सर्वात मोठी भेट ठरणार आहे, पण त्याबरोबरच स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक महत्त्वाचे प्रकल्पही याच वषी मार्गी लागणार आहेत. शहराचा हा स्मार्ट बदल वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांतच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे वाहतूककोंडी, वाहनतळ यांसारख्या मुख्य समस्यांपासून मोठा दिलासा मिळणार असून, विविध विकासकामांच्या उद्‌घाटनांचा धूमधडाका या वर्षी ठाणेकर अनुभवणार आहेत.
ठाणेकरांच्या नशिबी दरवर्षीप्रमाणेच यंदाही पावसाळ्यात पुन्हा खड्ड्यांचा फेरा आला. यामध्ये जीवितहानीही झाली. वाहनतळाचा प्रश्न ऐरणीवर असताना टोईंग व्हॅनचे दुखणे वाढले. नवीन ठाणे म्हणून विकास होत असलेल्या घोडबंदर परिसराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. दिवा डम्‍पिंग ग्राऊंडची समस्या अद्याप सुटली नाही की भंडार्ली प्रकल्प पुढे सरकला नाही. वर्ष सरता सरता कळवा आणि मुंब्रा उड्डाण पूल सुरू झाल्यामुळे थोडा दिलासा मिळाला, पण गावदेवी भूमिगत वाहनतळासारखा स्मार्ट प्रकल्प पूर्णत्वास येऊनही उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेतच राहिला.

एकंदरीत २०२२ हे वर्ष ठाण्यासाठी वादग्रस्त गेले तरी २०२३ हे वर्ष अनेक विकासकामांची भेट घेऊन आले आहे. यामध्ये सर्वात महत्त्‍वाचा प्रकल्प म्हणजे ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’. या प्रकल्पांतर्गत संपूर्ण ठाण्यात मजबूत रस्त्यांचे जाळे उभारण्यात येणार असून या वर्षी पावसाळ्यात ठाणे खड्डेमुक्त करण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने २१४ कोटींच्या निधीतून १२७ रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवातही झाली आहे. पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पदभार स्‍वीकारल्यानंतर ठाणे स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचा चंग बांधला आहे. त्याचा अपेक्षित बदलही दिसू लागला असून शहरातील भिंती नव्याने बोलू लागल्या आहेत. शहर कचरामुक्त दिसू लागले आहे. सहा महिन्यांत ठाण्याचा कायापालट करण्याच्या दृष्टीने कामे जोमाने सुरू असल्याने २०२३ च्या पहिल्या चार महिन्यांतच ठाणेकरांना शहराचे रुपडे बदललेले दिसणार आहे. या बदलत्या ठाण्याला जोड मिळणार आहे ती स्मार्ट विकासाची.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रात एक हजार कोटी रुपये खर्चाचे ३९ प्रकल्प मंजूर झाले होते. त्यापैकी २८ प्रकल्प पूर्ण झाले असून, ११ प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. या कामांसाठी केंद्र सरकारकडून ५०० कोटी, राज्य सरकारकडून २५० कोटी आणि पालिकेच्या तिजोरीतून २५० कोटी रुपये मंजूर झाले असून त्यापैकी सुमारे ६५४ कोटींचा निधी खर्च झाला आहे. कोरोनाकाळात अत्यंत संथ गतीने पुढे सरकत असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पातील गावदेवी भूमिगत वाहनतळ तयार झाले आहे. वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत करणारी इंटिलिजेंट ट्रान्सपोर्ट सिस्टिम (आयटीएस) प्रणाली पूर्ण झाली आहे. पादचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेले सॉफ्ट मोबिलिटी आदी प्रकल्पही २०२२ साली पूर्ण झाले आहेत; तर सहा महत्त्‍वाचे प्रकल्प २०२३ च्या मार्च महिन्यात पूर्ण होणार असल्याचा दावा स्मार्ट सिटीचे सीईओ संदीप माळवी यांनी केला आहे.

हे स्मार्ट प्रकल्प मार्गी लागणार
- २६० कोटी रुपये खर्च असलेल्या ठाणे पूर्वेतील सॅटीस प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. हे काम ६२ टक्के पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस आहे.
- ६५ कोटी रुपये खर्च करून पारसिक रेतीबंदर येथे चौपाटी उभारणीचे काम पालिकेने हाती घेतले आहे. ते ३२ टक्के पूर्ण झाले आहे. पण मार्च २०२३ पर्यंत या चौपाटीचे काम पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे मुदतीत हे काम पूर्ण करण्याचे आवाहन आहे.
- नागलाबंदर, कावेसर-वाघबीळ आणि कोपरी येथील वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटची कामेही अनुक्रमे ३६, ५० आणि ८४ टक्के पूर्ण झाली आहेत. हे प्रकल्पही मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या प्रकल्पांचा मुहूर्त लांबणीवर
- ठाणे आणि मुलुंड रेल्वेस्थानकांदरम्यानच्या नवीन ठाणे स्टेशनच्या कामासाठी २६२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मात्र, या स्टेशनसाठी आवश्यक असलेल्या जागेच्या हस्तांतरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने काम सुरू होऊ शकले नाही. या प्रकरणाची सुनावणी १२ जानेवारीला होणार आहे. यावेळी निकाल ठाणे महापालिकेच्या बाजूने लागल्यास तातडीने कामाला सुरुवात करण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे. मात्र हे स्‍थानक पूर्ण होण्यासाठी २०२४ पर्यंतचा कालावधी लागणार आहे.
- पाणीपुरवठ्याच्या रिमॉडलिंगच्या कामासाठी ४७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे ४७ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी बांधण्यात येणाऱ्या दोन जलकुंभांची जागा बदलल्याने विलंब झाला आहे. नवीन जागा अंतिम होताच हा प्रकल्पही मार्गी लावण्याचा दावा करण्यात आला आहे.
- पाणीपुरवठ्यासाठी स्मार्ट मीटरिंग आणि परफॉर्मन्स मॉनेटरिंगच्या कामासाठी १२१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ते कामही ८५ टक्के पूर्ण झाले आहे. मात्र विरोधामुळे व तांत्रिक अडचणींमुळे या प्रकल्पाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.