इच्छाशक्ती जोरावर अपंगत्वावर मात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इच्छाशक्ती जोरावर अपंगत्वावर मात
इच्छाशक्ती जोरावर अपंगत्वावर मात

इच्छाशक्ती जोरावर अपंगत्वावर मात

sakal_logo
By

तुर्भे ः बातमीदार
आत्मविश्वास, इच्छाशक्ती व प्रयत्नांच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येऊ शकते. नेरूळ गावातील निरंत पाटील यांनी ते कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. शरीराने साथ दिली नाही, त्यामुळे दोन्ही पायांनी पोलिओमुळे अपंग असूनही स्वतःचा व्यवसाय आणि समाजकार्य असा दुहेरी प्रवास त्यांचा सुरू आहे. शरीर जरी अपंग असले तरी मन मात्र खंबीर असल्याचा प्रत्यय त्यांच्या कृतीतून दिसत आहे. त्यामुळेच आजपर्यंत विविध सामाजिक, शैक्षणिक व कला क्षेत्रांत त्यांच्या कर्तृत्वाला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
-------------------------
निरंत पाटील हे मूळचे नेरूळ गावातील स्थानिक भूमिपुत्र. दीड वर्षाचे असताना त्यांना पोलिओसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले होते. त्यामुळे पोलिओचा परिणाम त्यांच्या मान, हात व पायांवर झाला. पोलिओ झाल्याने त्यांच्या आई-वडिलांनी कष्ट घेऊन वैद्यकीय इलाज सुरू ठेवले. सातवीपर्यंत त्यांना घरच्यांनी उचलून शाळेत नेले. यासाठी कधी मित्रांचे सहकार्य मिळाले तर कधी गावातील मंडळींनी सहकार्य केले. सातवीनंतर त्यांनी कुबड्यांच्या आधारे शिक्षण पूर्ण केले. १९८६ मध्ये ते आयुर्वेदिक उपचारासाठी सांगलीला गेले. एक वर्ष तिथे राहिल्यानंतर त्यांना काहीअंशी बरे वाटू लागले. मात्र त्यांना समाजाविषयी असणारी तळमळ स्वस्थ बसू देत नव्हती. याच विचारांतून १९९० मध्ये त्यांनी नवयुवक मित्र मंडळाची स्थापना केली. स्वखर्चाने तरुणांना व्यायामशाळांची सुरुवात केली. अपंग असूनही पारसिक बँकेत नोकरी करताना वकिलीचे शिक्षणही पूर्ण केले. तसेच ज्या मुलांना घरी अभ्यास करण्यासाठी अडचणी येत होत्या, अशांना ‘संकल्प क्लासेस’चे दरवाजे खुले ठेवले. त्यांनी २००७ मध्ये नेरूळ युवा मंच आणि त्यानंतर संकल्प चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करत विविध सामाजिक प्रश्न सोडवण्याचे व्यासपीठ उपलब्ध केले.
-----------------------------------------------
शिक्षणासाठीची पायपीट थांबवली
रायगड जिल्ह्यातील ‘मोहा’ समुद्रकिनारी वसलेल्या गावात त्यांनी २००८ मध्ये शाळा सुरू केली. या गावात फक्त पहिली ते चौथीपर्यंत शाळा होती. त्यामुळे मुलांना पुढील शिक्षणासाठी पाच किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. मात्र, निरंत पाटील यांनी पहिली ते दहावीपर्यंत शाळा सुरू करून मुलांची ही भटकंती थांबवली. आता तर महाविद्यालय सुरू करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. ठाणे, उरण, पनवेल परिसरातून विद्यार्थी शिक्षणासाठी त्यांच्याकडे येत आहेत. उत्तर प्रदेश, बिहार येथील छोट्या व्यावसायिकांच्या मुलांना निरंत पाटील यांची शाळा वरदान ठरत आहे.