हंगाम पोपटीचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हंगाम पोपटीचा
हंगाम पोपटीचा

हंगाम पोपटीचा

sakal_logo
By

राजेश कांबळे, पेण
भाताचे कोठार म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकरी आता विविध प्रकारचे पीक घेतो. रब्बी हंगामातील वाल, चवळी, मूग या कडधान्यांना तयार होण्यास विलंब लागल्याने यंदा गावठी वालाच्या शेंगा बाजारात उशिराने आल्‍या तरी पोपटी पार्टी, पोपटी कविसंमेलनांचा हंगाम सुरू झाला आहे.
पेणच्या बाजारपेठेत पावट्याच्या शेंगांना भाव सध्या वधारला असून ६० रुपये किलोने मिळणाऱ्या शेंगा ८० ते १०० रुपयांना विकल्या जात आहेत. काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात थंडी पडू लागली आहे. वर्षाचा शेवट उत्‍साहात, आनंदात साजरा करण्यासाठी प्रत्‍येक जण नियोजन करीत आहे. पोपटी पार्टीसाठी मुंबई, पुणे, नाशिक या बाजारातून येणाऱ्या पावट्यांच्या शेंगांना खवय्यांनी पसंती दिली आहे.

पेणमधील गावठी वालाच्या शेंगा भरलेल्या व चविष्ट असल्याने अनेक जण खरेदी करतात, मात्र या वर्षी अवकाळी पावसामुळे शेंगा बाजारात येण्यास विलंब लागला. त्यामुळे ग्राहकांनी पोपटीसाठी पावट्याच्या शेंगांना पसंती दिली आहे.
- दिनकर पाटील, शेंगा विक्रेते

पेणमध्ये दरवर्षी या महिन्यामध्ये पोपटीचे बेत आखले जातात. पोपटी पार्टीसाठी खास मुंबईहून अनेक जण गावाकडे रायगडमध्ये येतात. यंदा अवकाळी पावसामुळे वालाच्या शेंगा अजून तयार झालेल्या नाहीत. त्‍यामुळे सरत्‍या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्‍वागतासाठी आयोजित पार्ट्यांमध्ये पावट्याच्या शेंगांचा उपयोग करून पोपटी पार्टी केली जात आहे.
- प्रज्ञेश जुयकर, मुंबई

--------------------

वालाऐवजी पावट्याच्या शेंगांना पसंती

अजित शेडगे, माणगाव
थंडीचा हंगाम सुरू होताच खवय्यांना वेध लागतात ते पोपटीचे. शेतातील ताज्या वालाच्या शेंगा मडक्यात, अंडी, चिकन, मटणासह विशिष्ट पद्धतीने शिजवून तयार केलेली फक्कड मेजवानी म्हणजे पोपटी! यासाठी अनेक जण स्थानिक वालाच्या शेंगांना पसंती देतात, मात्र पावसामुळे यंदा वालाच्या शेंगा तयार झाल्या नसल्याने घाट माथ्यावरून येणारा पावटा पोपटीसाठी उपयोगात आणला जात आहे.
थंडी सुरू झाल्यानंतर शेतात पोपटी पार्ट्यांचे आयोजन सुरू झाले आहे. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत असून भावही घसरले आहेत. त्‍यामुळे वालाऐवजी पावटा पोपटी पार्ट्यांमध्ये भाव खात आहे. हंगामातील वालाच्या शेंगा अजून तयार झाल्या नसल्या तरी घाटमाथ्यावरून मुबलक येत असलेल्या पावट्याच्या शेंगांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. साधारण ६० ते ७० रुपये किलोने पावट्याच्या शेंगा बाजारात उपलब्‍ध आहेत.

मित्र, कुटुंबातील सदस्य खास कडधान्याच्या शेतात जाऊन तयार झालेल्या वालाच्या शेंगा, अंडी, मसाला लावलेले कोंबडी किंवा बटाटे, रताळ्यांची मडक्यात मांडणी करून शेतातील गवऱ्या, सुके शेण, पेंढा किंवा गवत यांच्या साह्याने भाजणी करतात. ठराविक वेळ उष्णता दिल्यानंतर मडक्यातील शेंगा, अंडी, मांस शिजते. त्‍याची चवच भारी लागते. या मडक्यातील शेंगांची व अंड्यांची चव उत्कृष्ट असल्याने ग्रामीण व शहरी भागात काही दिवसांपासून पोपटीचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. खवय्ये मित्रपरिवारासह शेतात अथवा माळरानावर एकत्र येत पोपटी पार्ट्या करीत आहेत.

पोपटीच्या थरांची खास लावणी
पोपटी लावण्यासाठी चांगल्या मातीचे रुंद तोंडाचे मडके, ओल्या वालाच्या किंवा पावट्याच्या शेंगा, चवीपुरते मीठ, मसाला, मांसाहारी खाणारे अंडी, चिकन किंवा कांदे, चिरलेले बटाटे इत्यादी पदार्थ मडक्यात शेंगांचे थर रचून ठेवतात व शेतातील भामरुडसारखी वनस्पतीने मडक्याचे तोंड बंद करतात. २० ते २५ मिनिटे शेण किंवा पेंढा, गवताने मडक्याला उष्णता देतात. त्यानंतर योग्य शिजलेल्या शेंगा, अंडी, चिकन खाण्यासाठी तयार होतात. जाणकार मंडळींनाच
पोपटी लावण्याचे काम उत्‍तम जमते, त्‍यामुळे ती अधिक चविष्ट होते.

स्थानिक वालाच्या शेंगा अद्याप बाजारात आलेल्‍या नाहीत, तर पावट्याच्या शेंगा बाजारात मुबलक प्रमाणात आल्या आहेत. वालाच्या शेंगांसारखी पावट्याच्या शेंगांना चव नसली तरी पावट्याच्या शेंगांची पोपटीही चांगली लागते. हंगाम सुरू झाल्‍याने पोपटीचे कार्यक्रम वाढत जातील.
- मंगेश खडतर, माणगाव

अवकाळी पावसामुळे स्थानिक वालाच्या शेंगांचा हंगाम लांबला आहे. खवय्यांनी पावट्याच्या शेंगांना पसंती दिली आहे. या शेंगांचा भावही वधारला आहे. गत वर्षी ६० ते ८० रुपये प्रतिकिलो असणाऱ्या शेंगा यंदा ७० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहेत.
- रोशन वर्मा, विक्रेता