स्केटिंग, फुटबॅालचे घणसोलीत धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्केटिंग, फुटबॅालचे घणसोलीत धडे
स्केटिंग, फुटबॅालचे घणसोलीत धडे

स्केटिंग, फुटबॅालचे घणसोलीत धडे

sakal_logo
By

घणसोली, ता.३१ (बातमीदार)ः विभागात असलेले सेंट्रल पार्क हे नेहमीच घणसोलीकरांसह इतर नोडमधील नागरिकांसाठी आकर्षणाचा भाग ठरलेला आहे. या उद्यानातील विविध सुविधांमुळे फिरण्यासाठी किंवा कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पण महापालिकेने या पार्कमध्ये सुरु केलेले स्केटिंग ट्रॅक, फुटबॅाल कोर्ट देखील आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
घणसोली हा सुविधायुक्त असेलला विभाग आहे. या विभागात नागरिकांना भुरळ घालणारी विविध स्थळे आहेत. त्यापैकीच एक स्थळ म्हणजे सेंट्रल पार्क. या पार्कमध्ये अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांची वर्दळ असते. अशातच पालिकेने घणसोलीकरांसाठी या पार्कमध्ये स्केटिंग आणि फुटबॅाल कोर्टची देखील निर्मिती केली आहे. त्यामुळे कसरतीचा खेळ म्हणून स्केटिंग सारख्या स्पर्धात्मक खेळाकडे क्रीडा प्रेमी आकर्षित होत आहेत. महापालिकेने गरजेप्रमाणे प्रती तासावर भाडे आकारून ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे एक प्रकारचे व्यासपीठच नवोदित खेळाडूंना उपलब्ध झाल्याने क्रीडा प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, येथे प्रॅक्टिस करणाऱ्या मुलांचा खेळ पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींसह लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांचे ग्रुप येत असल्याने महापालिकेची ही सुविधा अनेकांचे आकर्षण ठरत आहे.
-----------------------------
नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन
या सुविधेचा आनंद आता घणसोलीतील तसेच आजूबाजूचे नागरिक घेत आहेत. यामुळे खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचे काम महापालिकेने केले आहे. पण येथे फक्त खासगी संस्थांच्या स्पर्धा होत असल्याने पालिकेच्या माध्यमातून याठिकाणी स्पर्धा घेण्याची मागणी होत आहे.
----------------------------------------
घणसोली सेंट्रल पार्कमध्ये उभारण्यात आलेल्या स्केटिंग ट्रॅक आणि फुटबॉल कोर्टमुळे ज्येष्ठ नागरिकांचा विरंगुळा होत आहे. तसेच खेळाडूंना प्रशिक्षणासाठी बाहेर जाण्याची गरज उरली नसल्याने महापालिकेने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे.
-नारायण तारणे, ज्येष्ठ नागरिक
-------------------------------------
नवी मुंबई महापालिकेमार्फत खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी घणसोली सेंट्रल पार्कमध्ये स्केटिंग, फुटबॅाल कोर्ट उभारण्यात आले आहे. या उपक्रमाला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. येणाऱ्या काळात महापालिकेतर्फे येथे सामने घेण्याचा विचार आहे.
-रेवप्पा गुरव, क्रीडा अधिकारी, नवी मुंबई महापालिका