
भिवंडी शहराचे रुपडे पालटणार
भिवंडी, ता. ३१ (बातमीदार) : गेल्या काही वर्षात भिवंडी शहरात राबविण्यात आलेल्या मूळ प्रकल्पामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप केल्याने शहरवासीयांच्या सुविधांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शहरातील अनेक मूळ रहिवाशांना शहर सोडणे भाग पडले आहे. येत्या वर्षात महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. या निवडणुकीत शहराचे योग्य नियोजन राबविणाऱ्या लोकप्रतिनिधींची व आयुक्तांची प्रतीक्षा आहे.
भिवंडीत शहरविकासाची कामे केल्याचा दावा शहरातील लोकप्रतिनिधी करीत आहेत. मात्र, कोट्यवधी रुपयांचा सरकारचा निधी वापरून कोणता प्रकल्प नागरिकांच्या सोयीचा झाला हे लोकप्रतिनिधी नागरिकांना दाखवू शकलेले नाहीत. शहरातील नागरिक असंतुष्ट असून, या असंतोषाचा उद्रेक पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतून दिसेल, असे राजकीय जाणकारांकडून सांगितले जाते. तर पालिकेच्या नगररचना विभागात शहर विकासाचा नियोजनात्मक आराखडा बनवून जाहीर होणार आहे. त्यामुळे भिवंडीचे रूप पालटेल असा आशावाद निर्माण केला जात असला तरी हा विकास आराखडा राबविणारे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी पालिकेत असणे अपेक्षित आहे. भिवंडीत २०२३ मध्ये पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक यासह नवीन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, स्व. मीनाताई ठाकरे रंगायतन दुरुस्ती, राजीव गांधी उड्डाणपुलाखालील सुशोभीकरण, बिजीपी दवाखान्याचे उद्घाटन, निजामपूर व कुंभारवाडा पोलिस ठाण्याचे उद्घाटन, केंद्र सरकारच्या निधीतील पाच अद्ययावत आरोग्य केंद्रे, नवीन पोलिस इमारतीचे उद्घाटन, भिवंडी-सीएसटी लोकल आणि मेट्रो रेल्वेची सुरुवात या कामांची शहरवासीयांना अपेक्षा आहे.