
वडाळा स्थानकात नव वर्षानिमित्त पथनाट्यातून व्यसमुक्तीबाबत जनजागृती
वडाळा स्थानकात नववर्षानिमित्त
पथनाट्यातून व्यसमुक्तीबाबत जागृती
वडाळा, ता. ३१ (बातमीदार) ः नववर्षानिमित्त मोक्ष फाऊंडेशन आणि नाशिकच्या व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्राच्या वतीने शुक्रवारी (ता. ३०) वडाळा रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डी. एम. खुपेरकर यांच्या नेतृत्वाखाली वडाळा रेल्वेस्थानकात पथनाट्य सादर करण्यात आले. वडाळा स्थानक फलाट क्रमांक एकवर झालेल्या पथनाट्यादरम्यान व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली. नववर्षानिमित्त कोणतेही व्यसन न करता दारूमुक्तीच्या अनुषंगाने घोषवाक्य आणि पोस्टर लावून मेगाफोनद्वारे आवाहन करण्यात आले. रेल्वेप्रवासादरम्यान कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून खाद्यपदार्थ किंवा पेय स्वीकारू नये, रेल्वे रूळ ओलांडू नये, पादचारी पुलांचा वापर करावा, महिलांनी रात्रीच्या वेळी शक्यतो त्यांच्यासाठी असलेल्या राखीव डब्यातून प्रवास करावा, रेल्वेस्थानक परिसरात संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती आढळल्यास त्याबाबतची माहिती रेल्वे हेल्पलाईन क्रमांक १५१२ वर तात्काळ घ्यावी इत्यादींबाबत माहिती प्रवाशांना देत पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली.