
शहापूर तहसील कार्यालयात लाचखोरी
शहापूर, ता. ३१ (बातमीदार) ः शहापूर तहसील कार्यालयातील लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे. येथे दाखल असलेल्या खटल्याचा निकाल तक्रारदाराच्या नातेवाईकांच्या बाजूने देण्यासाठी कार्यालयातील शिपाई मिलिंद राऊत व खासगी व्यक्तीनेही तक्रारदाराकडे लाच मागितली होती. या दोघांवर लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहापूर तहसीलदारांकडे दाखल असलेल्या खटल्याचा निकाल तक्रारदाराच्या आई, मामा व मावशी यांच्या बाजूने देण्यासाठी व त्याची प्रत देण्यासाठी शिपाई मिलिंद राऊत यांनी तक्रारदाराकडे अडीच लाखांची लाच मागितली; तर खासगी व्यक्तीनेदेखील त्याच खटल्यात तक्रारदारकडे तीन लाखांची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतल्यानंतर राऊत व पातकर यांच्यावर लाचलुचपत विभागाने शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे, असे शहापूर पोलिसांनी सांगितले.