मुंबईतील हवामानाची अचूक माहिती मिळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील हवामानाची अचूक माहिती मिळणार
मुंबईतील हवामानाची अचूक माहिती मिळणार

मुंबईतील हवामानाची अचूक माहिती मिळणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३१ : सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क व आयआयटी मुंबई यांच्या सहकार्याने राजभवन येथे एक सौरऊर्जेवर चालणारे हवामान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज (ता. ३१) प्रकल्पाचे उद्‍घाटन करण्यात आले. या हवामान केंद्रामुळे मुंबई ‘वेदर अंडरग्राऊंड’ या जागतिक हवामानविषयक संस्थेच्या संकेतस्थळाशी जोडले जाणार आहे. जागतिक हवामान बदल हे गंभीर आव्हान असून विद्यापीठे, शिक्षक व संशोधक यांनी या विषयावर निकडीने काम केले पाहिजे, असे राज्यपालांनी या वेळी सांगितले.

हवामान केंद्र स्थापना सोहळ्याला सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क येथील भारत-अमेरिका अभ्यास केंद्राच्या संचालिका प्रा. पारोमिता सेन, प्रा. नील फिलिप, प्रा. ब्रायन वॉन हल, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू कारभारी काळे तसेच सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क येथील विज्ञान, तंत्रज्ञान व पब्लिक पॉलिसी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.

भारतात अशा प्रकारची ६ हवामान केंद्रे ओरिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश व इतर राज्यांत यापूर्वीच स्थापन करण्यात आली आहेत. लवकरच जुहू येथील एसएनडीटी महिला विद्यापीठ परिसर तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातदेखील हवामान केंद्र स्थापन केले जाणार असल्याचे प्रा. पारोमिता सेन यांनी या वेळी सांगितले. अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाऊंडेशनने सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कला दिलेल्या आर्थिक सहकार्यातून हे केंद्र स्थापन केले असून केंद्राच्या माध्यमातून मिळालेली हवामानासंबंधी माहिती राजभवनाच्या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

मुंबईच्या हवामानाचे अपडेट्स...
हवामान केंद्राच्या माध्यमातून मुंबईतील तापमान प्रदूषण, हवेची गुणवत्ता, आर्द्रता, सौर विकिरण, अतिनील किरणे, कार्बनडाय ऑक्साईडची पातळी आदीविषयक अचूक माहिती जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून पाहता येणार आहे.