
मुंबईबाहेरच्या ठिकाणांना पसंती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : कोरोना काळानंतर जवळजवळ दोन वर्षांनी मुंबईकर जनता नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाली आहे. यंदा नव्या वर्षाचे स्वागत मुंबईच्या बाहेर करण्याचा मुंबईकरांचा बेत आहे. सुट्टी सलग दोन दिवस आल्याने नवीन वर्ष मोठ्या उत्साहात साजरे होणार आहे. ऐनवेळी तिकीट मिळाले नाही तर बेत रद्द करावा लागू नये, यासाठी लोकांनी आधीच प्लॅनिंग केल्याचे टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.
ख्रिसमसनंतर पार्टी आयोजन करण्याचा सर्वांत मोठा इव्हेंट म्हणजे या दिनानिमित्त मित्र-मैत्रिणींची भेट होत असते. पुणे, लोणावळा, अलिबाग अशी मुंबईलगतची ठिकाणे लोकांना न्यू ईयर पार्टीसाठी आकर्षित करतात. कार्यक्रमाला लाईव्ह गायकांसह देशातील काही प्रसिद्ध डीजे हजेरी लावतात. तसेच परिवारासह जायचा कार्यक्रम असल्यास येथील अनेक अद्ययावत रिसॉर्टमध्ये रिसॉर्ट पार्टी आयोजित केली जाते. ख्रिसमस असो किंवा नववर्ष साजरा करणे असो, पुणे, लोणावळा, अलिबाग, गोवा येथे मोठी गर्दी होत असते. या वेळेस दोन वर्षांच्या कालावधीनंतर सेलिब्रेशन करण्याची संधी मिळाल्यामुळे ही संख्या अजूनच वाढलेली आहे.
वर्षातील शेवटचा दिवस हा मोकळ्या आकाशाखाली घालवण्यासाठी लोणावळा येथील पवना डॅमवर अनेक प्रवासी कॅम्पिंगला जातात. गुलाबी थंडीत शेकोटीभोवती नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा वेगळा अनुभव येथे मिळतो. त्यामुळे मित्र किंवा कुटुंबासोबत जाण्याला लोक प्राधान्य देतात. लोणावळा, खंडाळा येथील काही रिसॉर्टमध्ये लेझर शोदेखील आयोजित करत आहेत. पुण्यातील काही हॉटेल्स आणि रिसॉर्ट २०० रुपयांत जंगी पार्टी करायची ऑफर देत आहेत. म्युझिक डान्स आणि भोजनासोबत अनेक मजेदार गोष्टी येथे ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.
-------
या सीझनमधील व्यवसाय समाधानकारक आहे. बऱ्याच प्रमाणावर लोकांनी आधीच प्लॅनिंग करून ठेवलेला आहे. त्यामुळे गोंधळ फारसा पाहायला मिळत नाही. मुंबईबाहेर जाण्याचा ट्रेण्ड या वेळेस पाहायला मिळत आहे.
- संपत सावंत, नीता ट्रॅव्हल्स
------
मागील दोन वर्षे धंदा पूर्ण डाऊन होता. या वेळेस निर्बंध नसल्यामुळे चांगला सीझन आहे. या वेळेस शासनाने नियम योग्य वेळी जाहीर केल्यामुळे आम्हालासुद्धा बुकिंग व्यवस्थापन करणे सोपे झाले.
- केयुर शहा, शहा ट्रॅव्हल्स