नववर्षाच्या स्वागतासाठी चौपाट्या फुलल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नववर्षाच्या स्वागतासाठी चौपाट्या फुलल्या
नववर्षाच्या स्वागतासाठी चौपाट्या फुलल्या

नववर्षाच्या स्वागतासाठी चौपाट्या फुलल्या

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ ः सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी शनिवारी (ता. ३१) मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आणि गेटवे ऑफ इंडिया या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केलेली होती. तब्बल अडीच वर्षांच्या संकटांनंतर प्रथमच इतकी गर्दी पाहायला मिळाली आहे. अनेकांनी या वर्षाला निरोप देत असताना २०२२ चा शेवटचा सूर्यास्त आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

कोरोना प्रतिबंधामुळे गेली दोन वर्षे सार्वजनिक ठिकाणांवर जाण्यास निर्बंध होते. मुंबईकर मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आणि गेटवे ऑफ इंडियावा भेट देऊन शकले नव्हते; मात्र यंदा कोरोनाचे संपूर्ण निर्बंध हटवण्यात आल्याने नागरिकांची पर्यटनस्थळी मोठी गर्दी बघायला मिळाली आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भारताचे प्रवेशद्वार असलेल्या गेट ऑफ इंडियावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या रोषणाईमुळे गेट वे अतिशय आकर्षक दिसत होते. गेट वे शेजारील ताज हॉटेलची इमारतही रोषणाईने उजळली होती. याशिवाय सीएसएमटी स्थानकावरही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात होता.
-----
कोविडमुळे गेल्यावर्षी नवीन वर्षाच्या आगमनाचा आनंद घरूनच लुटला होता; मात्र यंदा आम्ही २०२२ ला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत मरीन ड्राईव्हला येऊन आनंद लुटला आहे.
- लरुपेश गव्हाणे, भायखळा
....
प्रत्येक वर्षी आम्ही ३१ डिसेंबरला सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मरीन ड्राईव्ह आणि गिरगाव चौपाटीवर येत होतो; मात्र कोरोनामुळे दोन वर्षे आम्ही येऊ शकलो नाही, परंतु यंदा कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे आम्ही उत्साहाने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मरीन ड्राईव्हला आलोय, फार छान वाटते आहे.
- श्रद्धा नवले, बदलापूर
.....
गेल्या वर्षी नागरिकांना आणि पर्यटकांना संध्याकाळी ५ ते पहाटे ५ पर्यंत या स्थळांवर जाण्यास पोलिसांनी बंदी घातली होती. त्यामुळे मला मरीन ड्राईव्हला येता आले नाही, पण यंदा बंदी नसल्याने मरीन ड्राईव्हला आलो. आता नवीन वर्षाचे स्वागत करून रात्री घरी जाणार.
- राजेश शर्मा, अंधेरी