अंधारातून स्वयंप्रकाशाचा प्रवास प्रेरणादाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंधारातून स्वयंप्रकाशाचा प्रवास प्रेरणादाई
अंधारातून स्वयंप्रकाशाचा प्रवास प्रेरणादाई

अंधारातून स्वयंप्रकाशाचा प्रवास प्रेरणादाई

sakal_logo
By

मुंबई, ता. ३१ : अमूर्तशैलीतील जगप्रसिद्ध चित्रकार तुका जाधव यांचा प्रवास अद्‍भुत आहे. अंधत्वावर मात करून दर्जेदार चित्रनिर्मिती करणारा हा चित्रकार स्वयंप्रकाशित झाला. त्यांचा प्रवास माझ्यासाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्‍गार ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी काढले. अंधत्वावर मात करत रंगांशी असलेली दोस्ती त्यांनी फक्त कायमच ठेवली नाही, तर त्यात अनेक प्रयोग ते करत आहेत. त्यांच्यासारख्या व्यक्तीकडे पाहून माझ्यातील कलाकार अस्वस्थ होतो आणि अधिक चांगले काम करण्याची ऊर्जा मला त्यांच्यापासून मिळते, अशी भावना शहा यांनी व्यक्त केली.

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, मुंबई (एनजीएम) यांच्यातर्फे प्रा. तुका जाधव यांच्या जीवनप्रवासावरील ‘स्पार्क इन द डार्क’ पुस्तकावर आधारित परिसंवादात शाह बोलत होते. या वेळी शहा यांच्या हस्ते सी. एस. नाग लिखित ‘स्पार्क इन द डार्क’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आणि याच नावाच्या लघुपटाचे प्रदर्शनही करण्यात आले. या लघुपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन सी. एस. नाग यांचे आहे. कार्यक्रमाला चित्रकार प्रा. तुका जाधव यांच्यासह सीसीआरटीचे चेअरमन डॉ. विनोद इंदूरकर, अभिनेत्री रत्ना पाठक शहा, गायिका चंदना दीक्षित, पुस्तकाचे लेखक-दिग्दर्शक सी. एस. नाग आदी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे नाव असलेल्या तुका जाधव यांनी काही कारणांमुळे अंधत्व आल्यानंतरही आपल्यातील चित्रकाराला जिवंत ठेवले. बीड जिल्ह्यातील एका छोट्या गावापासून सुरू झालेला त्यांचा चित्रकार होण्यापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्याचबरोबर अंधत्व आल्यानंतरही हा चित्रकार कुठेही थांबलेला नाही, हे या चित्रकाराचे मोठेपण आहे. हे त्यांचे असामान्यपण अधोरेखित होते, असे शहा म्हणाले. या वेळी डॉ. इंदूरकर, लेखक-दिग्दर्शन नाग आदींनी आपले विचार मांडले.