
आरोग्यासाठी १५० कोटी
सुजित गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता.१ : मेट्रो, विमानतळावरील एक धावपट्टी, वैद्यकीय महाविद्यालय, जागतिक स्तरावरील क्रीडा संकुले, विविध नागरी आरोग्य केंद्र आणि सीटी हॉस्पिटल आदी अत्याधुनिक पायाभूत सुविधा येणाऱ्या वर्षात सिडको, नवी मुंबई आणि पनवेल महापालिकेतर्फे उभारल्या जाणार आहेत. या सुविधांसाठी पनवेल महापालिकेच्या माध्यमातून १५० कोटींचा निधी उपलब्ध होणार असल्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षात पनवेलकरांची वाटचाल उत्कर्षाकडे होणार आहे.
पनवेल महापालिकेच्या हद्दीत येणारे आंतरराष्ट्रीय विमानतळाची पहिली धावपट्टी आणि एक टर्मिनल इमारत तयार होणार आहे. या जागतिक दर्जाच्या सुविधेला जोड देण्यासाठी पनवेल महापालिका प्रशासनाने आत्तापासूनच कंबर कसली आहे. पनवेलच्या वैभवात भर घालणाऱ्या प्रशासकीय भवनाचे काम वेगाने सुरु झाले आहे. त्यापाठोपाठ पनवेलची कोलमडलेल्या आरोग्यसेवेला अधिक बळकटी देण्यासाठी देशमुख यांनी शहरात १५ ठिकाणी नवीन आरोग्य केंद्र तयार करण्याचे नियोजन केले आहे. यात खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, खारघर, तळोजा, रोहिंजण, पालेखुर्द, काळुंद्रे आदी ठिकाणी असलेल्या सिडकोकालीन आरोग्य केंद्रांचाही समावेश आहे. तर पाच ठिकाणी जागा देण्यासाठी महापालिकेचा सिडकोसोबत पत्र व्यवहार सुरु आहे. तसेच आपत्तीकाळात पनवेलकरांच्या आरोग्यासाठी कळंबोली आणि तळोजामध्ये किमान ३० खाटांचे सुसज्ज असे सिटी हॉस्पिटल देखील उभारले जाणार आहे. तसेच शहरातील नागरिकांना खड्डे विरहित रस्ते, न तुंबणारी गटारे, भुयारी नाले, अद्ययावत अशी मलःनिस्सारण केंद्र, जलवाहिन्यांचे जाळे, जलकुंभ, ग्रामीण भागात नळजोडण्या आदीचा विकास करून पनवेलकरांना खऱ्या अर्थाने महापालिकेच्या सुविधांचा लाभ मिळण्यास नव्या वर्षात प्रारंभ होणार आहे.
---------------------------------------
आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडिअम
राजीव गांधी स्टेडिअमवर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सुविधा देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. या स्टेडिअमवर मुंबईतील क्रिकेट स्टेडिअमच्या दर्जाच्या पीच तयार केल्या जाणार आहे. एकूण ९ पीच तयार करण्याचे नियोजन केले आहे. त्याकरीता महापालिकेने जागतिक स्तरावरच्या विशेष सल्लागार संस्थेची नियुक्ती करणार आहे.
------------------------------------------
अहिल्यादेवी होळकर सभागृह
पनवेल परिसरातील सामान्य नागरिकांच्या समारंभासाठी, राजकीय व सामाजिक सभांकरीता भव्य, असे अहिल्यादेवी होळकर सभागृहाचे आयुक्त गणेश देशमुख यांनी नियोजन केले आहे.१६ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर तब्बल पाच हजार चौरस मीटर इतका खुला परिसर ठेवण्यात येणार आहे. दोन मजली या सभागृहात प्रशस्त पार्किंगची व्यवस्था असणार आहे.
-------------------------------------------
बेघरांसाठी निवारा केंद्र
आपत्कालिन परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती आणि शहरातील बेघरांना तात्पुरता आसरा मिळावा, याकरिता पनवेल महापालिकेने नियोजन केले आहे. पनवेल रेल्वे स्थानकाशेजारी तक्का गावाजवळ रात्र निवारा केंद्र तयार केला जाणार आहे. सिडकोकडून हा भूखंड मिळणार आहे.
--------------------------------------------
नव्या वर्षात पदभरती
नव्या वर्षात पनवेल महापालिकेत पद भरती होणार आहे. राज्य सरकारने महापालिकेच्या आकृती बंधाला मंजुरी दिली आहे. त्यानंतर पालिका प्रशासनाने सेवाशर्ती नियमावली देखील तयार करून घेतली आहे. सध्या आरक्षण वर्गीकरणाचे मसुदा राज्य सरकारकडे पाठवला आहे. तो मंजूर होऊन आल्यास नव्या वर्षात ६५० जागांवर भरती होणार आहे.
--------------------------------------------
मेट्रोच्या कामाला गती
तळोजा ते बेलापूर या मार्गावर सिडकोतर्फे उभारण्यात येणाऱ्या मेट्रोचे नव्या वर्षात लोकार्पण होण्याची शक्यता आहे. तळोजा ते सेंट्रल पार्क दरम्यानचे सहा रेल्वे स्थानकापर्यंतच्या रेल्वे स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच या मार्गावरील सिग्नल यंत्रणा, सुरक्षा चाचणी, प्रवासी हाताळण्याची परवानगी आदी प्रक्रीया सिडकोने पूर्ण केली आहे. तसेच सेंट्रल पार्कपासून सीबीडी-बेलापूर रेल्वे स्थानकापर्यंतचे पाच रेल्वे स्थानकांचे कामांनाही चांगला वेग पकडला आहे. ही कामे देखील नव्या वर्षात पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांतच मेट्रोची सफर होणार आहे.
-------------------------------------------
विमानतळावर टर्मिनल इमारतीचे काम
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला २०२३ या वर्षात आकार येणार आहे. सिडको व अदानी उद्योग समूहातर्फे उभारण्यात येत असणाऱ्या या विमानतळाच्या पहिल्या धावपट्टी आणि टर्मिनल इमारतीचे एक महिन्यांपूर्वीच भूमिपूजन करण्यात आले आहे. उलवे टेकडीचे सपाटीकरण आणि आठ मीटर उंचीचा भरावाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या सहा महिन्यांत भराव आणि सपाटीकरणाचे काम पूर्ण होऊन २०२३ च्या डिसेंबरपर्यंत विमानतळाला एक आकार आल्याचे दिसून येणार आहे.
---------------------------------------------