सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला मुदतवाढ
सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला मुदतवाढ

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला मुदतवाढ

sakal_logo
By

वाशी, ता. २ (बातमीदार) ः सिडको महामंडळाच्या गृहनिर्माण योजनांना मिळत असलेल्या नागरिकांच्या उदंड प्रतिसादामुळे दिवाळी- २०२२ योजनेतील घरांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अनामत रक्कम व शुल्कभरणा, संगणकीय सोडत या प्रक्रियांनाही मुदतवाढ मिळाली असल्याने नवी मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सिडकोतर्फे २४ ऑक्टोबर २०२२ रोजी महागृहनिर्माण योजना दिवाळी- २०२२ अंतर्गत नवी मुंबईच्या उलवे नोडमधील बामण डोंगरी रेल्वे स्थानक, खारकोपर पूर्व २ ए, खारकोपर पूर्व २ बी आणि खारकोपर पूर्व २ पी येथे ७,८४९ सदनिका बांधण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी बांधण्यात येणाऱ्या योजनेमुळे झपाट्याने विकसित होत असलेल्या व परिवहनदृष्ट्या समृद्ध असलेल्या उलवे नोडमध्ये परवडणाऱ्या दरातील घर घेण्याची संधी नागरिकांना उपलब्ध झाली आहे. या योजनेतील गृहसंकुलांना नेरूळ-उरण उपनगरीय रेल्वे मार्गावरील बामणडोंगरी व खारकोपर रेल्वे स्थानकांसह महामार्ग, प्रस्तावित एमटीएचएल महामार्गाद्वारे दळणवळणाची सुविधा लाभली आहे. तसेच सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या गृहसंकुलांपासून जवळच असल्याने उलवे नोडला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे.
--------------------------------------------
संगणकीय सोडत ३ फेब्रुवारीला
महागृहनिर्माण योजना दिवाळी- २०२२ करिता ऑनलाईन अर्ज नोंदणी ६ जानेवारी २०२३ पर्यंत करता येणार आहे. शुल्क भरणा ७ जानेवारी २०२३ पर्यंत करता येणार आहे. स्वीकृत अर्जदारांची प्रारूप यादी १४ जानेवारी २०२३ रोजी; तर स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी १८ जानेवारी २०२३ रोजी सिडकोच्या https://lottery.cidcoindia.com/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. योजनेची संगणकीय सोडत ३ फेब्रुवारी २०२३ रोजी पार पडणार आहे.