
ई-टॉयलेटची ठेकेदारामुळे दुर्दशा
खारघर, ता. २ (बातमीदार) : पनवेल महापालिकेने खारघरमध्ये ई-टॉयलेटची संकल्पना राबवली होती, पण या टॉयलेटच्या देखभालीचे काम असणाऱ्या एजन्सींने काम बंद केले असल्याने अस्वच्छता, पाण्याचा अभाव आणि दिवेही बंद आहेत. त्यामुळे महापालिकेने राबवलेल्या या संकल्पनेकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचे चित्र सध्या खारघरमध्ये आहे.
सिडकोने खारघर वसाहत निर्माण केली; मात्र परिसरात स्वच्छता गृह उभारले नाही. पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यावर पनवेल महापालिकेने खारघरमधील उद्याने आणि मैदान व इतर काही महत्त्वाच्या ठिकाणी ई-टॉयलेट बसवले आहेत; तर काही ठिकाणी कंटेनर टॉयलेट उभारले. ई-टॉयलेट उभारल्यावर वर्षभर ते बंद अवस्थेत होते. त्यानंतर काही दिवसांपासून टॉयलेटच्या कॉईन बॉक्समध्ये बिघाड, अस्वच्छता, पाण्याचा अभाव असल्यामुळे बंद अवस्थेत आहे. या ई-टॉयलेटमधील अस्वच्छतेमुळे महिलांची कुचंबणा होत आहे. याविषयी स्थानिक नागरिक आणि माजी नगरसेवकांनी पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष केले जात आहे.
----------------------------------
ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय
खारघर सेक्टर १९ मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रात परिसरातील ज्येष्ठ नागरिक येत असतात. अशातच काहींना मधुमेहासारखे आजार असल्यामुळे स्वच्छता गृह असणे आवश्यक आहे; मात्र केंद्रालगत असलेले ई-टॉयलेट बंद असल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. याविषयी सिडको अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता उद्यान आणि मैदानात पालिकेने टॉयलेट उभारले आहे. त्यामुळे सुविधा देण्याचे काम पालिकेचे असल्याचे सांगितले.
----------------------------------
खारघरमध्ये प्रभाग क्रमांक पाचमध्ये ई तसेच कंटेनर टॉयलेट बसवण्यात आले होते. सध्यस्थितीत पाण्याच्या अभावामुळे सर्व बंद आहेत. पालिका आयुक्तांकडे याबाबत लेखी तक्रार करूनही कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.
- हर्षदा उपाध्याय, माजी नगरसेविका
--------------------------------------
खारघरमधील शिल्प चौक येथील खेळाच्या मैदानात मुले, महिला आणि नागरिकांसाठी ई-टॉयलेट उभारण्यात आले होते; मात्र सर्व टॉयलेट आता बंद असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. याविषयी पालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
- नेत्रा पाटील, माजी नगरसेविका
---------------------------------
खारघरमधील ई-टॉयलेटचे काम एका एजन्सीला देण्यात आले होते. त्या एजन्सीकडून काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे खारघरमधील ११ ई-टॉयलेट बंद आहेत. लवकरच निविदा काढून नवीन एजन्सीची नेमणूक केली जाईल.
- वैभव विधाते, सहायक आयुक्त, पनवेल महापालिका