
सूर्यनगरी एक्स्प्रेसच्या अपघातामुळे रेल्वेसेवा विस्कळित
मुंबई, ता. २ : उत्तर-पश्चिम रेल्वेच्या जोधपूर विभागात वांद्रे टर्मिनस-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरल्याने पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. या घटनेमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या रद्द केल्या आहे, तर मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या काही गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे टर्मिनस ते जोधपूर धावणारी सूर्यनगरी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याने अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या. ट्रेन क्रमांक १४८९३/९४ पालनपूर-जोधपूर-पालनपूर एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १४८२१/२२ जोधपूर-साबरमती-जोधपूर एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १४८१९ जोधपूर-साबरमती एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १४८०४ साबरमती-जैसलमेर एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, तर ट्रेन क्रमांक १४७०७ बिकानेर-दादर रणकपूर एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक २२४७३, बिकानेर-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस लुणी-भिलडी जं.-पाटण-मेहसाणा मार्गे, ट्रेन क्रमांक १४८०२ इंदूर-जोधपूर एक्स्प्रेस चंदेरिया-मदार-फुलेरा जं.-मेरता रोड मार्गे, ट्रेन क्रमांक १९२२३ अहमदाबाद-जम्मू तवी एक्स्प्रेस पालनपूर-मारवाड जं.-मदार-फुलेरा जं.-मेरता रोड (बायपास)-बिकानेर मार्गे वळविण्यात आली आहे. याशिवाय मध्य रेल्वे मार्गावरील ट्रेन क्रमांक ११०९० पुणे - भगत की कोठी एक्स्प्रेस आणि ट्रेन क्रमांक १६३१२ कोचुवेली- श्री गंगा नगर एक्स्प्रेस महेसाणा, पाटण, भिलडी आणि लुनी मार्गे वळविण्यात आल्या आहेत.