पोलिस भरतीसाठी १९ हजार अर्ज

पोलिस भरतीसाठी १९ हजार अर्ज

अलिबाग, ता. ३ (बातमीदार) ः दीर्घ प्रतीक्षेनंतर पोलिस भरतीबाबत तरुणांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. रायगड जिल्ह्यात पोलिस शिपाईसह चालक पदाच्या २७८ जागांसाठी भरती होत आहे. मंगळवारपासून मैदानी चाचणी परीक्षेला सुरुवात झाली आहे. राज्‍यभरातून जवळपास १९ हजार उमेदवारांनी अर्ज भरले असून भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी रायगड पोलिस दलाने कंबर कसली आहे.
पोलिस होण्याचे प्रत्येक तरुण तरुणीचे स्वप्न असते. त्यासाठी खेड्यापाड्यातील मुले वर्षोनुवर्षे मेहनत घेतात. रायगडमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली असून पोलिस शिपाई पदासाठी २७२ व पोलिस चालक पदासाठी ६ जागांसाठी भरती होणार आहे. एकूण १९ हजार १७६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्या पोलिस शिपाई पदासाठी १९ हजार १७६ व चालक पदासाठी ६४७ अर्ज प्राप्त झाले आहेत.
रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग येथील पोलिस मुख्यालयात भरतीसाठी मैदानी चाचणी घेण्यात येत आहे. २२ जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.
पहिल्या दिवशी चालक पदासाठी मैदानी चाचणी घेण्यात आली. सकाळी पाच वाजल्यापासून चाचणीला सुरुवात झाली. चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांची सुरुवातीला बायोमॅट्रीक पडताळणी करून आत घेण्यात आले. त्यानंतर कागदपत्रे तपासणी, उंची व छाती तपासणी करण्यात आली.
मैदानी चाचणीमध्ये पुरुष उमेदवारांना १६०० मीटर व महिला उमेदवारांना ८०० मीटर धावण्याची चाचणी करण्यात आली आहे. प्रत्येक दिवशी सुमारे १२०० उमेदवारांची चाचणी घेण्याचे नियोजन आहे. भरतीच्या ठिकाणी ७० सीसी टीव्ही बसविण्यात आले आहेत. तसेच ३२ व्हीडीओ रेकॉर्डिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. भरती शांततेत पार पाडण्यासाठी ५३ पोलिस अधिकारी, ३६७ कर्मचारी व २७ मंत्रालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गैरप्रकार रोखण्यासाठी चोख व्यवस्‍था
पोलिस भरती प्रक्रिया निपक्षपाती होण्यासाठी चोख व्यवस्था केली आहे. कोणत्याही गैरप्रकाराला यात थारा नाही. कोणतीही व्यक्ती ओळखीचे, प्रलोभन दाखवून, पैशांची मागणी करीत असल्यास किंवा आर्थिक गैरव्यवहाराचा संशय आल्यास तत्काळ पोलिस अधिक्षक कार्यालयात ०२१४१-२२८४७३, २२२०२८ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. भरतीकरिता येणाऱ्या उमेदवारांची रायगड जिल्हा पोलिस दलाकडून क्षात्रैक्य समाज हॉल, कुरूळ,अलिबाग येथे निवासाची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.

साध्या वेशात गुप्तचर यंत्रणा
जिल्ह्यातील पोलिस भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी रायगड पोलिसांमार्फत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उमेदवारांमध्ये गुप्तचर यंत्रणा साध्या वेशात तैनात केली आहे. कोणाचाही हस्तक्षेप होऊ नये, यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून नजर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com