शे-दोनशे रुपयांसाठी फेरीवाल्यांना परवाने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शे-दोनशे रुपयांसाठी फेरीवाल्यांना परवाने
शे-दोनशे रुपयांसाठी फेरीवाल्यांना परवाने

शे-दोनशे रुपयांसाठी फेरीवाल्यांना परवाने

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३ ः नवी मुंबईत काही मुठभर अधिकाऱ्यांमुळे चांगल्या व प्रामाणिक अधिकाऱ्यांचे नाव खराब होत असल्याची टीका ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांनी केली. शे-दोनशे रुपयांसाठी फेरीवाल्यांचे परवाने वाटप केल्यामुळे शहरात ६० टक्के परवानेधारक फेरीवाले शहराबाहेरचे असल्याची पोलखोल नाईक यांनी केली. समाजविकास विभागाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे नाईक यांनी कान टोचले.
पालिका प्रशासनातील कार्यरत असणाऱ्या काही मुठभर भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे चांगले व प्रामाणिक अधिकारी बदनाम होतात, असा पुनरुच्चार नाईक यांनी केला. हे टाळण्यासाठी प्रशासनाने पुन्हा फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करावे. तसेच नोड आणि गावनिहाय सर्वेक्षण करायला हवे. जो फेरीवाला नवी मुंबईच्या ज्या भागात राहतो. त्या परिसरात त्याला फेरीवाला परवाने मिळायला हवेत. तसेच सिडकोने दिलेल्या भूखंडांवर अशा फेरीवाल्यांसाठी मार्केट तयार करा, अशी मागणी नाईकांनी केली आहे. याचबरोबर नवी मुंबई महापालिकेला सिडकोने जे भूखंड दिले आहेत. त्या भूखंडांचा वापर शहरातील फेरीवाला मुक्त रस्ता, भिकारी, तृतीयपंथीय मुक्त नवी मुंबई शहर तयार करण्यासाठी करा, असे आवाहनही नाईक यांनी प्रशासनाला केले आहे. तसेच त्या लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी एखादी वास्तू तयार करायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
-----------------------------
प्रभांगांची तुलना थेट पाकिस्तानसोबत
भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांचा समाचार घेताना शहरातील बकाल झालेल्या प्रभागांची तुलना थेट पाकिस्तान आणि बलुचिस्तानशी केली. ज्या लोकांना अधिकाऱ्यांसोबत सवांद साधण्याची कला येते, अशांचे प्रभागांमध्ये चांगल्या सोयी आहेत. नवी मुंबईतील काही प्रभाग हे न्यूयॉर्कसारखे तर काही प्रभाग पाकिस्तान आणि बलुचिस्तान सारखे असल्याचे वर्णन नाईकांनी केले आहे. विकासामध्ये एकसमानता येण्यासाठी त्याठिकाणी प्रशासनाने एकाच नजरेने सर्वांकडे बघितले पाहीजे, अशी अपेक्षाही यावेळी नाईक यांनी व्यक्त केले.
----------------------------
नाईकांचा पुन्हा करिष्मा ?
गेल्या अनेक दशके नवी मुंबईतील विविध जातीपातीच्या साडेचार लोकांनी आपल्यावर विश्वास व्यक्त केला आहे. हा विश्वास या पूढेही असाच राहून, गणेश नाईकांच्या इच्छेनेच नेतृत्व शहराला मिळणार, असे भाकीत भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी केले. तसेच शहरात लवकरच झुणका भाकर केंद्रांचे प्रमाणही वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.