राजावाडी रुग्णालयात सुविधांची वानवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजावाडी रुग्णालयात सुविधांची वानवा
राजावाडी रुग्णालयात सुविधांची वानवा

राजावाडी रुग्णालयात सुविधांची वानवा

sakal_logo
By

घाटकोपर, ता. ४ (बातमीदार) ः घाटकोपर येथील पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात रुग्णांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. दररोज उपचारांसाठी येणाऱ्या शेकडो रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्याचा मोठा फटका बसत असल्‍याचा आरोप अनेक सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. काही दिवसांपूर्वीच शिवआरोग्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले होते. त्‍यानंतर लोक अधिकार संघ संघटनेच्‍या कार्यकर्त्यांनी रुग्णालयातील बंद असलेल्या यंत्रणांबाबत पाहणी करत अधिकाऱ्यांना साकडे घातले आहे.
रुग्णालयात बंद असलेली सिटी स्कॅन मशीन तसेच एमआरआय मशीन अद्याप सुरू झालेली नाही. याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्याप पालिकेकडून कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नव्या वर्षात तरी येथील गैरसोयी दूर व्हाव्यात म्हणून नववर्षाच्या पूर्वसंध्येला राजावाडी रुग्णालयात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जाऊन पाहणी करत अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. महापालिकेचा कोट्यवधींचा फंड असूनही सुविधा पुरवल्या जात नसल्‍याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.
सुविधा लवकरात लवकर सुरू केल्या नाहीत, तर भारतीय लोक अधिकार संघ संघटनेच्या वतीने सांविधानिक मार्गाने जनआक्रोष आंदोलन करण्यात येईल. याची जबाबदारी ही महानगरपालिका, एन विभाग आणि राजावाडी रुग्णालय प्रशासन यांची राहील, असा इशाराही सुहास कारंडे, बिरेंद्र मोर्या, हुशार मागाडे, अतुल साळवे आदींनी दिला आहे.
दरम्यान, शिवआरोग्य सेनेचे राज्य समन्वयक जितेंद्र सकपाळ यांच्यासह ईशान्य मुंबई सहसमन्वयक आणि माजी उपविभागप्रमुख प्रकाश वाणी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नावर तसेच डॉक्टरांची संख्या वाढवावी, आयसीयू अत्याधुनिक करावे यासाठी येथील उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. भारती राजुलवाल, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पैयनवार यांची भेटघेऊन त्यांना निवेदन दिले आहे. त्यावर प्रशासनाकडून पालिकेकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. आता पुन्हा सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत पाठपुरावा करत राजावाडी रुग्णालयात सुविधा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.