
संपाचे जिल्ह्यात पडसाद
अलिबाग, ता.४(बातमीदार)ः खासगीकरणाविरोधात रायगड जिल्ह्यातील वीज कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. या संपात जिल्ह्यातील एक हजार ८०० कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयासह गावे, वाड्यांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने आंदोलनाचा सर्वसामान्यांना फटका बसला आहे.
विजेच्या खासगीकरणामुळे वीज अधिक महाग होणार आहे. तसेच करोडो शेतकऱ्यांना अनुदानित वीज मिळणे बंद होणार आहे. त्यामुळे विविध समस्या निर्माण होणार आहे. याबाबत अनेक वेळा सरकारकडे वीज कर्मचाऱ्यांनी संघटनेच्यावतीने बैठक, चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, सरकारकडून याबाबत कोणतीही सकारात्मक भूमिका घेण्यात आली नसल्याने वीज कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. या आंदोलनात रायगड जिल्ह्यातील वीज कर्मचाऱ्यांनी देखील सहभाग घेतला होता. त्यामुळे बुधवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुरवठा खंडित झाल्याने अनेक तास नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आली होती. जिल्ह्यातील इंदापूर येथील साळे विजेचा बिघाड झाला होता. या भागाला धाटाव येथून वीज पुरवठा देण्याचे प्रयत्न सुरू होते. तसेच तळा उपकेंद्राच्या ठिकाणी देखील वीज पुरवठा खंडित झाला असून ८० टक्के दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. अलिबाग तालुक्यातील आवास या ठिकाणीदेखील वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्याठिकाणी वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम वेगात सुरु आहे. तसेच पनवेल तालुक्यातील कोन याठिकाणी इंडिया बुल्स येथे वीज पुरवठा बंद कोलाड येथेही पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे कंत्राटी एजन्सीद्वारे नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमार्फत पुरवठा सुरु करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
----------------------------
कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या
महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपन्यांतील खासगीकरण धोरण बंद करा, वीज कर्मचारी, सुरक्षा रक्षकांना कायम करा, महावितरणमध्ये अदानी कंपनीला समांतर वीज वितरणाचा परवाना देऊ नये, तिन्ही कंपन्यांमधील रिक्त जागा भरा, इम्पॅनलमेंट पद्धतीचे कंत्राटीकरण बंद करा, महावितरणमधील २०१९ नंतरचे उपकेंद्रे कंपनीमार्फत चालवा, उपकेंद्रामध्ये कायम कर्मचाऱ्यांची पदस्थापना करा, अशा विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.
---------
जिल्ह्यातील ९५ टक्के कर्मचारी संपावर गेले आहेत. कंत्राटी एजन्सीद्वारे तुटपुंज्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर दुरुस्तीचे काम सुरु आहे. संपामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही, याचा प्रयत्न आहे.
-ए.आय मुलाणी, अधीक्षक अभियंता, पेण