
सीसीटीव्हीच्या आधारे रिक्षा चोर अटकेत
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ५ : डोंबिवली पूर्वेत तुकाराम नगरमध्ये राहणारे आनंद मिरजकर (वय ६३) यांचा रिक्षाचा व्यवसाय आहे. १ जानेवारीला सायंकाळी त्यांनी रवी पाटील मैदान परिसरात आपली रिक्षा उभी करून ठेवली होती. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे रिक्षा उभी केलेल्या ठिकाणी गेले असता त्यांना रिक्षा दिसली नाही. रिक्षा चोरीला गेल्याप्रकरणी त्यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार रामनगर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असता चोरीची घटना सीसी टीव्हीमध्ये कैद झाली होती. त्याआधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. रिक्षा ज्या मार्गाने मार्गस्थ झाली त्या ठिकाणचे सीसी टीव्ही तपासत व गुप्त बातमीदारांमार्फत पोलिसांनी आरोपी महेश देवाडिगा (वय ३५) याचा शोध लावला. सागर्ली येथे तो रहात असून त्याठिकाणी सापळा रचून पोलिसांनी महेशला अटक केली. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीची चोरीला गेलेली रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे. त्याच्यावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत का, याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.