
६३५ महिलांच्या सक्षमीकरणाचा ध्यास
खारघर, ता. ९ (बातमीदार): क्षेत्र कुठलेही असो, आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यामुळे कष्टकरी महिलांच्या सक्षमीकरणासाठी समाजकार्याची आवड असलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन सुरू केलेल्या शिवराज्य प्रतिष्ठान या संस्थेमुळे नवी मुंबई परिसरातील ३८० स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून ६३५ महिलांना घरगुती उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.
चूल आणि मूल यामध्येच गुरफटून राहणाऱ्या महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगाराच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने २०१६ मध्ये शिवराज्य प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था सुरू करण्यात आली होती. या संस्थेच्या माध्यमातून कोपरखैरणे, घणसोली, रबाळे, गोठीवली, महापे, बोनकोडे, जुहूगाव, तुर्भे, नेरूळ, तसेच आदिवासी भागात गेल्या सात वर्षांत ३८० स्वयंसहाय्यता बचत गटांची निर्मिती झाली आहे. या बचत गटातून कर्ज घेऊन ६३५ महिलांनी विविध व्यवसाय सुरू केले आहेत. यासाठी विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या श्रुष्टी फाळके, मंदा साळुंखे, संतोष फाळके, उषा शिलवणे, सतीश तोरणे, अनिता येवले, महेंद्र पवार, अनुजा पाडावे, सरिता पवार आणि शशिकला शिंदे यांनी एकत्र येऊन प्रोत्साहन दिले आहे.
----------------------------------------------
वार्षिक उलाढाल तीन कोटी
या संस्थेच्या माध्यमातून सुरू झालेल्या बचतगटाची सभासद संख्या ६,६७३ असून वार्षिक उलाढाल तीन कोटी रुपये आहे. तसेच संस्थेने पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत ३,२७० महिलांचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यात आले. भारत सरकार अंतर्गत पाचशे महिलांना ई श्रम कार्ड वाटप करण्यात आले आहे; तर प्रधानमंत्री अटल पेन्शन योजनेत ९८० महिलांची नोंदणी करण्यात आली आहे.
--------------------------------------------
सात वर्षांत बचत गटाच्या माध्यमातून ६३५ महिलांना घरगुती उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले. त्यामुळे अनेक महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यामुळे समाधान वाटत आहे.
- अॅड. श्रुष्टी फाळके, अध्यक्षा, शिवराज्य प्रतिष्ठान
----------------------------
कॅटर्स व्यवसायासाठी दोन लाखांची आवश्यकता होती. शिवराज प्रतिष्ठानने कर्ज दिल्याने आधार मिळाला.
- सुरेखा पाटील, सदस्य, तुर्भे
-----------------------------
किराणा दुकानासाठी एक लाखाची गरज होती. संस्थेने वेळेवर कर्ज उपलब्ध करून दिले.
- आनंदी नेवेकर, सदस्य, घणसोली