चार हजार मजुरांना रोजगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चार हजार मजुरांना रोजगार
चार हजार मजुरांना रोजगार

चार हजार मजुरांना रोजगार

sakal_logo
By

मोखाडा, ता. ८ : मोखाड्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेव्यतिरिक्त अन्य कोणतेही रोजगाराचे साधन नाही. मजुरांना रोजगार मिळवून देणाऱ्या रोजगार सेवकांच्या काम बंद आंदोलनामुळे मजूर बेरोजगार झाले होते; मात्र रोजगार सेवकांचा संप मिटताच नरेगाच्या कामांना गती मिळाली आहे. मोखाड्यात २३५ कामे सुरू झाली असून या ठिकाणी चार हजार २०४ मजुरांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे मोखाड्यातील मजुरांच्या स्थलांतराला काहीअंशी आळा बसला आहे.
मोखाड्यात खरिपाच्या हंगामानंतर नरेगा ही मजुरांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणारी एकमेव सरकारी योजना आहे. शेतकरी आणि शेतमजुरांना मोखाड्यात खरिपाच्या शेतीचा शाश्वत रोजगार आहे. शेतीचा चार महिन्यांचा हंगाम संपल्यानंतर येथील मजूर बेरोजगार होतात. या भागात कोणतीही कारखानदारी अथवा औद्योगिक वसाहत नाही. त्यामुळे शासनाने बेरोजगारांच्या हाताला काम देऊन उदरनिर्वाहासाठी रोजगार हमी योजना आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर रोजगार सेवकांच्या मानधनावर नियुक्त्या केल्या आहेत.

----------------------
तब्बल २५ दिवस काम बंद आंदोलन
मजुरांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या रोजगार सेवकांनी ५ डिसेंबरपासून आपल्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केले होते. महिनाभर हे आंदोलन सुरू होते. नागपूर हिवाळी अधिवेशन काळात सरकारकडून रोजगार सेवकांच्या मागण्यांचा विचार केला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर ३१ डिसेंबरला पालघर जिल्ह्यातील रोजगार सेवकांनी आपले काम बंद आंदोलन मागे घेतले. त्यानंतर लगेचच नरेगाच्या कामांना गती मिळाली आहे.

--------------------
२३५ कामे उपलब्ध
सध्यस्थितीत मोखाड्यात ग्रामपंचायतीची १५२ कामे सुरू झाली आहेत. या ठिकाणी दोन हजार ९४४ मजूर काम करत आहेत. तसेच यंत्रणांच्या ८३ कामांवर एक हजार २६० मजूर काम करत आहेत. अशा एकून २३५ कामांवर चार हजार २०४ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. त्यामुळे मोखाड्यात मजुरांच्या स्थलांतराला काहीअंशी आळा बसला आहे. तालुक्यातील जॉबकार्डधारक मजुरांची संख्या लक्षात घेता तालुक्यात नरेगाची कामे मोठ्या संख्येने सुरू होणे अपेक्षित आहे.