बच्चेकंपनीने लुटला विविध खेळांचा आनंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बच्चेकंपनीने लुटला विविध खेळांचा आनंद
बच्चेकंपनीने लुटला विविध खेळांचा आनंद

बच्चेकंपनीने लुटला विविध खेळांचा आनंद

sakal_logo
By

वडाळा, ता. ८ (बातमीदार) ः असुरक्षित आणि वंचित मुलांसाठी कार्य करणाऱ्या इंडियन असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ ॲडॉप्शन ॲण्ड चाईल्ड वेल्फेअर (आयएपीए) यांच्या वतीने शनिवारी (ता. ७) किंग्ज सर्कल येथील जी.एस.बी. स्पोर्टस् पॅव्हेलियन येथे पाल्य व पालक यांच्यामधील ऋणानुबंध कायम टिकून राहावेत यासाठी ‘वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलन’ आयोजित करण्यात आले होते. यात मोठ्या संख्यने बच्चेकंपनीने सहभाग नोंदवून स्नेहसंमेलनातील विविध खेळांचा आनंद लुटला.
या वेळी बच्चेकंपनीला आकर्षित करणारी गुडी बॅग देऊन त्यांचे कार्यक्रमात स्वागत करण्यात आले; तर नृत्य, चित्रकला, वेषभूषा आणि फुगे फोडण्याची स्पर्धा यात बच्चेकंपनीने हिरिरीने सहभाग नोंदवून उपस्थितांची मने जिंकली. अनेकजण टॅटू काढण्यात मग्न; तर कुणी सेल्फी काढण्यास उत्सुक होते; तर आठवणींचे जतन करण्यासाठी चित्रकला स्पर्धेत आपल्या पाल्यासोबत पालकांनीही कार्ड पेपरवर हाताचा पंजा उमटवला. असे हे स्नेहसंमेलन बच्चेकंपनीच्या किलबिलाटाने गजबजले होते. मुलांचा आनंद पाहून पालकही त्यांच्यात हरवून गेले होते. या वेळी असोसिएशनच्‍या मुंबई व्यवस्थापक सविता नागपूरकर, स्मिता झणकर, हर्ष मोरमकर, डॉ. नीलिमा मेहता, जागृती मांडवकर, वीरा राव आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोना काळातील दोन वर्षे वगळता प्रतिवर्षी वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. यात ज्यांनी मुले दत्तक घेतली आहेत ते कुटुंब तसेच ज्यांना मुले दत्तक घ्यायची आहेत अशी कुटुंबे सहभागी होतात. प्रोत्साहन व आत्मविश्वास वाढवण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे अयोजन करण्यात येते.
- सविता नागपूरकर, मुंबई व्यवस्थापक, आयएपीए

नऊ महिन्यांची असताना आम्ही कार्तिकीला दत्तक घेतले. तिच्यामुळे आमचे कुटुंब पूर्ण झाले आहे. ती आता अडीच वर्षांची झाली आहे. विशेष म्हणजे आयएपीएचे आम्हाला वेळोवेळी सहकार्य मिळत असल्याने कार्तिकीच्या संगोपनात कोणतीही अडचण आम्हाला भासली नाही.
- दिशा अंकलीकर, पालक

आयएपीएमुळे आमच्या घराला घरपण आले आहे. याशिका पाच महिन्यांची असताना तिला आम्ही दत्तक घेतले. आज ती सव्वातीन वर्षांची झाली आहे. तिच्यामुळे आमच्या आयुष्याला उभारी मिळाली आहे. तिचे संगोपन करताना कोणतीही समस्या निर्माण झाली नाही. आयएपीए कडून वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन आम्हाला उपयोगी पडत आहे.
- कविता काळे, पालक