हनुमान कोळीवाड्यात गांधीगिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हनुमान कोळीवाड्यात गांधीगिरी
हनुमान कोळीवाड्यात गांधीगिरी

हनुमान कोळीवाड्यात गांधीगिरी

sakal_logo
By

उरण, ता. ८ : चार दशकांपासून हनुमान कोळीवाड्यातील ग्रामस्थ पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. वारंवार आंदोलन करूनही प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागत नसल्याने ग्रामस्थांचा संयम सुटत चालला आहे. अखेर संतप्त ग्रामस्थांनी जुना शेवा कोळीवाडा गावात रविवारी (ता. ८) ठाण मांडत गांधीगिरीचा अवलंब केला. या वेळी गावाची साफसफाई करून हजारो ग्रामस्थांनी जेएनपीएचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. तसेच, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार करत गावातच ठाण मांडून बसणार असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
जेएनपीए बंदराच्या उभारणीसाठी उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा आणि शेवा ही दोन गावे विस्थापित करण्यात आली आहेत. मात्र, हनुमान कोळीवाड्याचे पुनर्वसन वाळवीग्रस्त मातीच्या जागेत करण्यात आल्याने फेरपुनर्वसनची मागणी गेल्या ३८ वर्षांपासून केली जात आहेत. सरकारच्या १९८४ च्या जनगणनेनुसार शेवा कोळीवाडा गावातील ८६ शेतकरी व १७० बिगर शेतकरी अशा एकूण २५६ कुटुंबे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. पुनर्वसनावर अनेकदा ग्रामस्थांनी आवाज उठवला. मात्र, जेएनपीएने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर हनुमान कोळीवाड्यातील हजारो ग्रामस्थांनी जुना शेवा कोळीवाडा गावात रविवारपासून साफसफाई करून सरकारचा निषेध केला आहे. साफसफाईचा हा कार्यक्रम जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत सुरूच ठेवणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
हनुमान कोळीवाडा गावातील पारंपरिक मच्छीमारांना सर्वोच्च न्यायालयाने नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिल्यामुळे मच्छीमारांची आर्थिक परिस्थितीत सुधारणार आहे. त्यामुळे मूळ शेवा कोळीवाडा गावात ग्रामस्थ स्वखर्चाने हक्काची घरे बांधून कायमचे आजपासून राहणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या वेळी रमेश कोळी, सुरेश कोळी, परमानंद कोळी, नितीन कोळी, हरेश कोळी, मेघनाथ कोळी, मंगेश कोळी, नम्रता कोळी, दीप्ती कोळी, कल्याणी कोळी, ज्योती शेवेकर, उज्वला कोळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

पोलिसांचा फौजफाटा
पोलिस प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी वर्ग सकाळपासून शेवा कोळीवाडा गावाच्या आजूबाजूच्या परिसरात बंदोबस्तासाठी होते. पाच पोलिस निरीक्षक, १२ सहायक पोलिस निरीक्षक, १२५ पोलिस कर्मचार्‍यांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी असल्याची माहिती सहायक आयुक्त धनाजी क्षीरसागर यांनी दिली. या वेळी उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पाटील, न्हावा शेवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर भटे आदींनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

सरकारने शेवा कोळीवाडा गावातील ८६ शेतकरी व १७० बिगर शेतकरी अशा एकूण २५६ कुटुंबांना बोरीपाखाडी उरण येथील १७ हेक्टर जमिनींपैकी ९१ गुंठे जमिनीत संक्रमण शिबिर तयार केले आहे. गुरांच्या कोंडवाड्याप्रमाणे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांना तेथे ठेवलेले आहे. त्या ठिकाणी घरांना लागलेल्या वाळवीनेही ग्रामस्थांना सोडलेले नाही. रोजीरोटीसाठी पर्यायी संपदा (नोकरी) दिलेली नाही. त्यामुळे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे.
- रमेश कोळी, ग्रामस्थ, हनुमान कोळीवाडा

जेएनपीटीने शेवा कोळीवाड्यातील ग्रामस्थांच्या जमिनी, साधन संपदा व घरेदारे हिरावूनही सरकारच्या मापदंडानुसार जेएनपीए प्रशासन पुनर्वसन करत नाही. जेएनपीएकडून होत असलेला मानवी हक्कांचा छळ असह्य झाल्याने हनुमान कोळीवाडा (शेवा कोळीवाडा) गावातील ग्रामस्थांनी लोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या ११ जुलै २०१७ रोजीच्या आदेशानुसार ग्रामसभेत मूळ शेवा कोळीवाडा गावात कायमस्वरूपी राहायला जाण्याचा निर्णय घेऊन ठराव मंजूर केला आहे.
- सुरेश कोळी, ग्रामस्थ, हनुमान कोळीवाडा

जेएनपीए प्रशासनाने शेवा कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी १९८२ मध्ये राज्य सरकारला दिली होत; मात्र ३८ वर्षांत ते कागदावरच आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी आज मूळ हनुमान कोळीवाड्याच्या गावठाणाच्या जागेवर घरांची उभारणी आणि गावाची साफसफाई करणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
- मंगेश कोळी, ग्रामस्थ, हनुमान कोळीवाडा

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. समाजात शांतता अबाधित राहावी. कोणाचेही नुकसान होऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे.
- धनाजी क्षीरसागर, सहायक पोलिस आयुक्त, न्हावा शेवा पोर्ट विभाग