शिक्षक आमदार निवडणुकीचे पनवेल केंद्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक आमदार निवडणुकीचे पनवेल केंद्र
शिक्षक आमदार निवडणुकीचे पनवेल केंद्र

शिक्षक आमदार निवडणुकीचे पनवेल केंद्र

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. ९ (वार्ताहर)ः कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील विधान परिषदेसाठीच्या निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत १३ जानेवारी असून ३० जानेवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे गोव्याच्या सीमेपासून थेट गुजरातच्या सीमेपर्यंत पसरलेल्या कोकण विधान परिषद मतदारसंघातील या निवडणुकीत चुरस रंगणार आहे. अशातच महिला मतदारांची संख्या अधिक असलेल्या पनवेलमध्येच शिक्षक आमदाराचे भवितव्य ठरणार आहे.
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. पालघर जिल्ह्यात ६,७१८, ठाणे १४,६९५ रायगड १०,०८५, रत्नागिरी ४,०६९, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २,१६४ मतदार नोंदणी झाली आहे. या निवडणुकीत एकूण ३७ हजार ७३१ मतदार मतदान करणार आहेत. कोकण शिक्षक मतदारसंघात मागील निवडणुकीच्या वेळी ३७ हजार ६०४ मतदार होते. या वेळी अवघ्या १२७ मतदारांची वाढ झाली आहे. अशातच अंतिम मतदार यादीनुसार संपूर्ण कोकण विभागात एकूण ३७ हजार ७३१ मतदार नोंदणी झाली आहे. यात १८ हजार ९७ स्त्री मतदार, तर १९ हजार ६२२ पुरुष मतदार आहेत. दरम्यान, रायगड जिल्ह्यात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी रायगड जिल्ह्यात एकूण १० हजार ८५ शिक्षकांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. यात ५ हजार ७७३ स्त्री मतदार असून ४ हजार ३१२ पुरुष मतदारांचा समावेश आहे, तर पनवेलमध्ये ४,२५८ मतदार असून यापैकी महिलांची संख्या २,९४२ एवढी आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातील आमदारकीचे भवितव्य महिलांच्या मतदानातून ठरणार आहे.
------------------------------
निवडणूक आयोगाच्या सूचना
- शिक्षक मतदारसंघात निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया ही इतर निवडणुकीपेक्षा वेगळी आहे. निवडणुकीत मतपत्रिकेवर मतदान होणार आहे. मतदाराला मतदान हे पसंती क्रमांकानुसार करावयाचे आहे. मतदान करताना आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करणे बंधनकारक आहे.
- ज्या उमेदवारास पहिल्या पसंतीक्रम देण्यासाठी निवडले आहे, त्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रम असे नमूद केलेल्या रकान्यात १ हा अंक नमूद करून मतदान करावे. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या एकापेक्षा जास्त असेल तरी १ हा अंक केवळ एकाच उमेदवाराच्या नावासमोर नमूद करावा. उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर पुढील पसंतीक्रम २, ३, ४ आहेत.
- पसंतीक्रम हा केवळ अंकात दर्शविला जाईल. अंक हे भारतीय आंतरराष्ट्रीय अंक स्वरूपात जसे १,२,३, इत्यादी किंवा रोमन स्वरूपातील I, II, III इत्यादी किंवा संविधानाच्या ८ व्या अनुसूचीतील भारतीय भाषेतील अंकाच्या स्वरूपात नोंदविता येतील. मतपत्रिकेवर स्वाक्षरी किंवा आद्याक्षरे किंवा नाव किंवा कोणतेही शब्द नमूद करू नये, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
--------------------------------