
दिव्यांग विद्यार्थ्यांना विम्याचे बळ
राहुल क्षीरसागर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दिव्यांग शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यर्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याबरोबरच त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणी व उपचारासाठी लागणारा खर्च हा पेलवणारा नसतो. यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना विमा कवच देण्याचा निर्णय ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार एक विशेष योजना बनवून विम्याचा पहिला हप्ता देखील जिल्हा परिषद प्रशासनाकडून भरण्यात येणार आहे. त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना विम्याचे कवच मिळणार आहे.
आजच्या घडीला प्रत्येकाचा विमा असणे व गुंतवणूक करणे आवश्यक झाले आहे. विम्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांना अडचणीच्या काळात आर्थिक आधार मिळतो. कोरोनासारख्या जीवघेण्या काळात तर आपली सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने दिव्यांगांना आर्थिक मदत करण्यापलीकडे जाऊन त्यांना विमा योजनांचा लाभ मिळवून देण्याचा निर्णय ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक दिव्यांग विद्यार्थ्याला विमा कवच लागू होणार आहे.
सरकारच्या निरामय योजनेंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला औषधोपचार, साहित्य आदी विविध उपचारांसाठी या विमा कवचाचा त्यांना फायदा होणार आहे. तसेच या विम्याचा कालावधी एक वर्षाचा असून हे विमा कवच एक लाख रुपयांचे असणार आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांवर विम्यासाठी भराव्या लागणाऱ्या हप्त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक भार पडू नये यासाठी एक विशेष योजना बनविण्याची सूचना महिला व बाल विकास विभागाला देखील देण्यात आली आहे. त्या माध्यमातून भरावा लागणारा ५०० रुपयांचा विम्याचा पहिला हप्ता देखील जिल्हा परिषद प्रशासन भरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
....
दोन हजार विद्यार्थ्यांना लाभ
ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आरोग्याची काळजी घेत, त्यांची आरोग्य तपासणी देखील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येणार आहे. त्यानुसार दिव्यांग शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या दीड ते दोन हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.
....
ग्रामीण भागातील दिव्यांग शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांग बालकांच्या औषधोपचाराच्या खर्चाचा भार अधिक असल्याचे लक्षात आल्याने, या बालकांच्या औषधोपचारासाठी निरामय योजनेंतर्गत विमा कवच देण्यात येणार आहे. त्यामुळे या बालकांचे आरोग्य तंदरुस्त राहण्यास मदत होणार आहे.
- मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. ठाणे