
वेतन फरकाच्या रकमेची भेट
उल्हासनगर, ता. १० (बातमीदार) : पालिका आयुक्त अजीज शेख यांनी नवीन वर्षात उल्हासनगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमेची भेट दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या जानेवारीच्या पगारात फरकाची रक्कम जमा केली जाणार असल्याने कर्मचारी सुखावून गेले आहेत. सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमेबाबत जुलै महिन्यात निर्णय घेण्यात आला होता. त्यावर आयुक्त अजीज शेख यांनी शिक्कामोर्तब केले आहे. यासंदर्भात आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त डॉ. करुणा जुईकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे, मुख्य लेखापरीक्षक शरद देशमुख यांनी कागदपत्रांची पूर्तता केली आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या जानेवारी महिन्याच्या पगारात फरकाची रक्कम एक टक्का किंवा दोन हजार रुपये जमा करण्यास सुरुवात केली जाणार आहे. याशिवाय कुटुंब निवृत्तिवेतन मिळत नाही, अशा मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला एकरकमी रक्कम दिली जाणार आहे. यामुळे पालिकेवर दरमहा एक कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार असल्याची माहिती भिलारे यांनी दिली.