म्हसा यात्रेत श्रद्धेला विज्ञानाची जोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हसा यात्रेत श्रद्धेला विज्ञानाची जोड
म्हसा यात्रेत श्रद्धेला विज्ञानाची जोड

म्हसा यात्रेत श्रद्धेला विज्ञानाची जोड

sakal_logo
By

मुरबाड, ता. १० (बातमीदार) : श्रद्धेला विज्ञानाची साथ देण्याचा प्रयत्न करत म्हसोबा यात्रेत मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त म्हसा येथील देवस्थान ट्रस्टमार्फत एक वेगळा पायंडा पाडण्यात आला आहे. म्हसोबा यात्रेत देवाला नवस बोलण्यासाठी किंवा नवस फेडण्यासाठी आलेल्या भाविकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून भाविकांना एक वेगळाच संदेश दिला.

शारीरिक व्याधीसाठी केवळ देवाला नवस बोलून चालणार नाही. त्यासाठी डॉक्टरांकडून शारीरिक तपासणी करणे गरजेचे आहे, असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला. मंदिरालगत उभारण्यात आलेल्या तंबूमध्ये भाविकांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात येत होती. रोटरी क्लब डोंबिवली भोपरचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे जितेंद्र पाटील, रिसर्च सेंटर हॉस्पिटल नेरूळ व खांबलिंगेश्वर देवस्थान म्हसा ट्रस्टचे अध्यक्ष दशरथ पष्टे यांच्यातर्फे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात सुमारे एक हजार लोकांची तपासणी करण्यात आली व त्यांना मोफत औषधे वाटप करण्यात आली.
कार्यक्रमासाठी उद्‍घाटक म्हणून आमदार किसन कथोरे उपस्थित होते. मुरबाड तहसीलदार संदीप अवारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे, पंचायत समिती सभापती स्वरा चौधरी, मुरबाड नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे व नगरसेवक यांनी शिबिरास भेट दिली.

--------------
३० तज्ज्ञ डॉक्टरांचा ताफा
चिदानंद ब्लड बँक डोंबिवली यांनी या शिबिरात सहभाग घेतला. रक्तातील साखर, रक्तदाब, ईसीजी, हिमोग्लोबिन तपासण्या मोफत करण्यात आल्या. तसेच डोळे तपासणी करून चष्मेवाटप करण्यात आले. ३० तज्ज्ञ डॉक्टर, २० नर्स, पाच फार्मासिस्ट व सहायक असा मोठा स्टाफ शिबिरासाठी उपस्थित होता. शिबिरासाठी रोटरी क्लबचे प्रकल्प अध्यक्ष मिलिंद जगताप, भावेश म्हात्रे, विकास म्हारसे आदींनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.