तुंगारेश्वर महादेव मंदिरच्या भाविकांना दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुंगारेश्वर महादेव मंदिरच्या भाविकांना दिलासा
तुंगारेश्वर महादेव मंदिरच्या भाविकांना दिलासा

तुंगारेश्वर महादेव मंदिरच्या भाविकांना दिलासा

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. १० (बातमीदार) : तुंगारेश्वर अभयारण्यात येणाऱ्या भाविक, पर्यटक यांच्याकडून आकारले जाणारे प्रवेश शुल्क अखेर राज्य शासनाने कमी केले आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना दिलासा मिळाला आहे. तुंगारेश्वर येथील सदानंद महाराज आश्रम व अभयारण्य येथे जाण्यासाठी पूर्वी ५८ रुपये आकारले जाणारे प्रवेशशुल्क आता ३० रुपये एवढे करण्यात आले आहे.
शुल्क कमी करण्यासाठी तुंगारेश्वर देवस्थान शासनाकडे सतत पाठपुरावा करत होते. वसई तालुक्याच्या पूर्वेकडील भागात तुंगारेश्वर पर्वत आहे. या पर्वतावर तुंगारेश्वर देवस्थान आहे. निसर्गरम्य पर्वतांच्या कुशीत वसलेल्या श्री तुंगारेश्वर महादेव मंदिराला महाराष्ट्र शासनाने सन २००० मध्ये ‘क’वर्गीय पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने भाविक शंकर महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात. मंदिर हे वन विभागाच्या तुंगारेश्वर अभयारण्यात येत असल्यामुळे वन विभाग प्रत्येक भाविक व पर्यटकाकडून प्रवेश शुल्क म्हणून ५८ रुपये घेत होता. त्यामुळे महादेव मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नाहक भुर्दंड भरावा लागत आहे; मात्र त्याबदल्यात कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत. तुंगारेश्वर महादेव मंदिरापर्यंत जाणारा तीन किलोमीटर पक्का रस्ता, दोन नाल्यांवर पक्का पूल, शौचालय, पिण्याचे पाणी, प्राणिसंग्रहालय यापैकी एकही सुविधा दिलेली नाही. तरीही वन खात्यामार्फत प्रतिव्यक्ती प्रवेशशुल्क वसूल केले जाते.

----------
अध्यादेश जाहीर
प्रवेश शुल्क रद्द व्हावे यासाठी श्रीतुंगारेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ प्रयत्न करत होते. नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात तुंगारेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रमेश घोरकना, माजी नगरसेवक मिलिंद घरत, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार राजेश पाटील यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन हा प्रश्न मांडला होता. त्या वेळी त्यांनी प्रवेश शुल्क कमी करण्याचे आश्वासन दिले होते. शासनाने यासंदर्भात अध्यादेश जारी करून प्रवेश मूल्य पन्नास टक्क्यांनी कमी केले आहे. आता भाविकांना ५८ रुपयांऐवजी ३० रुपये प्रवेश मूल्य द्यावे लागणार आहे. या घटवलेल्या प्रवेश शुल्कामुळे भाविकांना दिलासा मिळाला आहे.