
दिव्यांग दाखल्यासाठी नागरिकांची परवड
वाडा, ता. १० (बातमीदार) : वाडा तालुक्यातील अंध व अपंग नागरिकांना अपंगाच्या दाखल्यासाठी तर वाहन परवाने व इतर परवान्यासाठी अनुक्रमे पालघर व विरार, जव्हार येथे जावे लागते. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होऊन पैशाचा व वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा ते दोनदा ही शिबिरे वाडा येथे घेण्यात यावीत, अशी मागणी शिवसेना वाडा शहर शाखेच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
वाडा तालुक्यातील अंध व अपंगाना लागणाऱ्या अंपगाच्या दाखल्यासाठी पालघर येथे जावे लागते. त्याऐवजी वाडा ग्रामीण रुग्णालय येथे महिन्यातून एकदा वा दोनदा ही सेवा उपलब्ध करुन दिल्यास तालुक्यातील अंध व अपगांना दिलासा मिळेल. त्याचबरोबर वाडा तालुक्यातील वाहनधारकांना आपले वाहन परवाना व इतर कागदपत्रे मिळवण्यासाठी वसई, जव्हार येथे जावे लागते. त्यांचा वेळेचा व पैशांचा अपव्यय होऊ नये यासाठी महिन्यातून एकदा वा दोनदा वाहन परवाना शिबिर वाडा येथे घ्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
तहसीलदारांना निवेदन देताना शिवसेनेचे तालुका सन्मवयक प्रकाश केणे, उपतालुकाप्रमुख तुषार यादव, तालुका सचिव निलेश पाटील, शहरप्रमुख प्रमोद घोलप, उपप्रभागप्रमुख चेतन भोईर आदी उपस्थित होते.