
भिवंडीत सुगडे विक्रेते ग्राहकाच्या प्रतीक्षेत
भिवंडी, ता. ११ (बातमीदार) : गेल्या काही वर्षांपासून ठराविक सणाचे आकर्षण लोकांना राहिले असून बरेचजण केवळ सोपस्कार म्हणून सण साजरे करताना दिसत आहेत. त्यामुळे भिवंडीतील सुगड विक्रेते सध्या ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या सणांच्या इव्हेंटला अधिक महत्त्व आल्याने त्याचा फायदा राजकीय लोक चांगला उठवीत आहेत.
भिवंडीत परंपरा जपणाऱ्या मराठी महिलांसाठी यंदा २५ हजारांपेक्षा जास्त सुगड बाजारात विक्री दाखल झाली आहेत, पण अजूनही ही सुगड खरेदीसाठी महिला घराबाहेर पडल्या नाहीत. येत्या दोन दिवसांत या महिला सुगड खरेदीसाठी गर्दी करतील, अशी माहिती सुगड विक्रेत्यांनी दिली आहे. पूर्वी सुगड्यांसाठी विशिष्ट आकाराची छोटी मडकी बनविली जात होती. ही मडकी ग्रामीण भागातील कुंभार महिला बनवीत होत्या. त्यामुळे या मडक्यात सर्व वस्तू राहत होत्या. आता दिवाळीत विक्रीसाठी आणलेली छोटी खेळण्यातील मडकी (बोळकी) सुगडे म्हणून वापरली जात आहेत. ही मडकी मुंबईतील धारावीमध्ये चाकावर बनविली जात आहेत. ज्या महिलांना जास्त आकाराच्या वस्तू भेट म्हणून द्यावयाच्या असतात ते मोठ्या आकाराचे मडके सुगड पूजनासाठी नेत आहेत, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.
..
राजकीय प्रसिद्धीसाठी वापर
संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत घराघरांत हळदी-कुंकुवाचे कार्यक्रम होत असतात; पण गेल्या काही वर्षांपासून या सणाचा फायदा उठवीत काही राजकारणी सार्वजनिक हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करीत आपली लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. हे इव्हेन्ट सध्या होत असले तरी पूर्वी जेव्हा भिवंडीतील कुंभार महिला स्वतः लहान मडकी घडवीत होत्या तेव्हा संक्रांतीच्या हळदी-कुंकवाच्या दिवशी मडक्याचा आवा (भाजलेली मडकी) लुटण्याचा इव्हेन्ट करायचे, त्यावेळी परिसरातील सर्व महिला त्या आव्यातून मडकी घेऊन जात होते.