
परराज्यातील रक्तपुरवठ्यासाठी हवी एनओसी!
मुंबई, ता. ११ : परराज्यांमध्ये रक्ताचा पुरवठा करण्यासंदर्भात राज्य रक्त संक्रमण परिषदेने (एसबीटीसी) नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. रक्तपेढ्यांकडून जादा किमतीने परराज्यांत मोठ्या प्रमाणात रक्तपुरवठा केला जातो. त्यावर नियंत्रण म्हणून रक्तपेढ्यांनी परराज्यांत वा परजिल्ह्यांत रक्तपुरवठा करताना जिल्हा रुग्णालयाच्या अधिष्ठाता किंवा शल्यचिकित्सकांकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
एसबीटीसीच्या म्हणण्यानुसार अतिरिक्त रक्त आणि रक्त घटक एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रात हस्तांतरित करताना आवश्यक तापमान राखत नसल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार रक्तपेढ्यांनी प्रथम जिल्हा रुग्णालयात रक्ताची गरज किती आहे याची चौकशी करावी. रक्तपुरवठ्याबाबत प्रथम जिल्हा रुग्णालयाला प्राधान्य द्यावे. तेथे गरज नसल्यास अधिष्ठातांची एनओसी घेऊन परजिल्ह्यांत वा परराज्यांत रक्तपुरवठा करू शकतात. यासोबतच रक्तपेढ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या पुरवठा शुल्काची माहितीही द्यावी लागणार आहे. तसेच निर्धारित मानक तापमानात रक्त मिळाल्याचे प्रमाणपत्र एसबीटीसी आणि एफडीए कार्यालयाला द्यावे लागेल.