विकासकामांच्या नावाने तिजोरीची लूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकासकामांच्या नावाने तिजोरीची लूट
विकासकामांच्या नावाने तिजोरीची लूट

विकासकामांच्या नावाने तिजोरीची लूट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ११ : मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या प्रकल्पांतर्गत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे आणि सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत. त्यामुळे शहराचा कायापालट होणार असला तरी या विकासकामांच्या आडून काही ठेकेदार ठाणे पालिकेची तिजोरी लुटत आहेत, असा गंभीर आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे. तसे पुरावेच त्यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांना सादर केले आहेत. तसेच या सर्व प्रकरणांची चौकशी करून दोषी ठेकेदार आणि त्यांना अभय देणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ठाणे शहरात विविध माध्यमांतून कोट्यवधींची विकासकामे होत आहेत. ही कामे अर्धवट आणि दर्जाहीन असतानाही कंत्राटदारांना देयके अदा करण्यात आल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला. भाजप विकासकामांच्या विरोधात नाही; पण पालिकेच्या तिजोरीची होत असलेली लूट थांबावी आणि दोषींवर कारवाई व्हावी यासाठी ‘रखवालदार’ म्हणून कर्तव्य बजावणार, असे केळकर यांनी सांगितले.

----------------------
त्याच त्याच पदपथांवर कामे
शहरातील पदपथांच्या कामातूनही ठेकेदारांनी लूट केल्याचेही आयुक्तांच्या निदर्शनास आणले. त्याच-त्याच पदपथांवर पुन्हा काम करण्यात आले असून या कामांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. या बोगस विकासकामांचे पुरावे केळकर यांनी सादर करून संबंधितांवर कारवाईची मागणी आयुक्तांकडे केली. भाजप ठाणेकरांच्या प्रत्येक पैशाचा हिशोब घेणार असून प्रसंगी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

------------------------
बिल अदा; मात्र कामे अपूर्ण
कोपरी येथे एक कोटी रुपये खर्चून जॉगिंग ट्रॅक बनवण्यात आला. हे काम अर्धवट असून दर्जाहीन आहे, तरीही त्याचे पैसे कंत्राटदाराला अदा करण्यात आले आहेत. २६ तलावांच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी १८६ कोटींची तरतूद करण्यात आली होती. केवळ विकासाच्या नावाखाली यात कोट्यवधींची लूट होत होती. याबाबत हरकत घेतल्यानंतर आता १५ तलावांसाठी ६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. उथळसर येथील जोगीला तलावासाठी या आधीच साडेतीन कोटींचा खर्च करण्यात आला आहे. एवढा खर्च करूनही येथील काम अर्धवट आहे. तरीही दुसऱ्या टप्प्यात या तलावासाठी नव्याने तरतूद करण्यात आली आहे. या सर्व कामांच्या तक्रारी आणि घोटाळ्याचे पुरावे घेऊन आमदार संजय केळकर यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली.

-----------------------------------
‘श्रीरंग’च्या रहिवाशांच्या सूचना स्वीकारणार
‘श्रीरंग’च्या रस्ता रुंदीकरणाबाबत आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. रस्ता रुंदीकरण करताना रहिवाशांना त्रास होणार नाही. हे काम करण्यापूर्वी रहिवाशांच्या सूचना आणि हरकतींचा विचार केला जाईल, असे आयुक्तांनी सांगितल्याचा दावा आमदार केळकर यांनी केला.