
एनएसएस कॅम्पमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनावर जनजागृती
मुंबई, ता. १० : सांताक्रूज येथील एल. एस. रहेजा कला आणि वाणिज्य महाविद्यालय यांचा एनएसएस कॅम्प आयोजित करण्यात आला होता. हा कॅम्प २९ डिसेंबर ते ४ जानेवारीदरम्यान बदलापूर येथील राहोटोली गावातील जे. कृष्णमूर्ती सेल्फ एज्युकेशन सोसायटी आणि आरोग्य योग नॅचरोपथी इन्स्टिट्यूट येथे संपन्न झाला. या कॅम्पमध्ये स्वच्छता, वृक्षारोपण आणि झाडांना कंपोस्ट खत देणे, असे उपक्रम राबवले गेले. या निवासी शिबिरात एनएसएस कार्यक्रम अधिकारी रामसागर यादव, शिक्षक कर्मचारी सदस्य डॉ. अक्षता कुलकर्णी, शिक्षकेतर कर्मचारी सदस्या अर्चना आणि रीना गुप्ता यांच्यासह ५० एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते. संध्याकाळी शिबिरात अतिथी व्याख्यान सत्रात प्राचार्य डॉ. देबाजित एन. सरकार आणि इतर तज्ज्ञांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. तसेच सदर शिबिरामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन, राष्ट्रउभारणीत एनएसएसचे महत्त्व याविषयी जनजागृती कार्यक्रम करण्यात आला. तरुणांसाठी करिअरच्या संधी, पथनाट्य, नवीन वर्षाचा संकल्प, योग पद्धतींचे पालन करणे, आरोग्यासाठी खेळाचे महत्त्व आणि दैनंदिन जीवनासाठी मानवी मूल्ये आणि सराव कसा करावा यावर मार्गदर्शन करण्यात आले.