वाहतुकीबाबत नवी मुंबईकरांना स्वयंशिस्त गरजेची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतुकीबाबत नवी मुंबईकरांना स्वयंशिस्त गरजेची
वाहतुकीबाबत नवी मुंबईकरांना स्वयंशिस्त गरजेची

वाहतुकीबाबत नवी मुंबईकरांना स्वयंशिस्त गरजेची

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : सुनियोजित शहर असलेल्या नवी मुंबईला वाढत्या लोकसंख्येमुळे पार्किंग आणि वाहतुकीच्या समस्यांनी घेरले आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहने पार्किंग करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे भविष्यात शहराच्या वाहतुकीला शिस्त लागावी, असा प्रयत्न असल्याचे नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सुरू असलेल्या वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या उद्‍घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
मध्यवर्ती ठिकाण असल्याने नवी मुंबईतून मुख्य रस्ते जातात. यात एपीएमसी, जेएनपीटी, मुंबई-गोवा, मुंबई-पुणे महामार्गाची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. या मार्गावरील अपघातांवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडून विविध योजना राबवण्यात येत आहेत. याठिकाणी असलेले ब्लॅक स्पॉट शोधून परिणामकारक उपाययोजना करण्यावर वाहतूक विभागाकडून भर देण्यात येत आहे. तसेच नवी मुंबईतील वाहतूक समस्यांचा आढावा वाहतूक शाखेमार्फत घेण्यात येत असून सिडको आणि महापालिकेच्या माध्यमातून अधिक सुधारणा करण्यात येणार असल्याचे यावेळी पोलिस आयुक्त भारंबे यांनी सांगितले. यावेळी सहपोलिस आयुक्त संजय मोहिते, परिमंडळ-१ चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, परिमंडळ-२ चे उपायुक्त पंकज डहाणे, वाहतूक विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे, तसेच प्रमुख अतिथी म्हणून व्हॉईसओवर आर्टिस्ट मेघना एरंडे उपस्थित आदी उपस्थित होते. यावेळी नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी नवी मुंबई शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचे सांगितले.
------------------------
मनोरंजनातून नियमांचे धडे
विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या अभिनेत्री व्हॉईसओवर आर्टिस्ट मेघना एरंडे यांनी आपल्या खास शैलीत वेगवेगळ्या आवाजाच्या माध्यमातून वाहतूक नियम पाळण्याचा संदेश देत सर्वांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमादरम्यान वाहतूक नियम आणि अपघात नियंत्रण यावर नृत्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते छोट्या पोलिसाचे अनावरण करण्यात आले.