
कल्याण पूर्वमध्ये रस्ते सुरक्षा सप्ताहाला सुरुवात
कल्याण, ता. १२ (बातमीदार) : कल्याण पूर्वमध्ये वाहतूक कोंडी झाली की ती दूर करण्यासाठी वाहतूक पोलिस अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरून धावपळ करत असतात. त्यांचे हे काम नेहमी पाहत आलो असून आज रस्ता सुरक्षा सप्ताहच्या माध्यमातून जवळून पाहता आले, असे प्रतिपादन राष्ट्रीय फिल्म पुरस्कार विजेता अभिनेता हर्षल शिंदे यांनी केले.
कल्याण पूर्वमध्ये रस्ते सुरक्षा सप्ताहाचा उद्घाटन सोहळा बुधवार (ता. ११) पार पडला. या वेळी आरटीओ वाहन निरीक्षक अनिल धात्रक, कोळसेवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक सुनील गवळी, आरटीओ सहायक वाहन निरीक्षक सुरजितसिंग चव्हाण, ठाणे शहर पोलिस बॅन्ड पथक, ओमकार मोटार ड्राईव्हिंग स्कूलचे सचिन सावंत, सामाजिक कार्यकर्ते शिवा शाहू, अतीष चौधरी, विजय राजघोर, विश्वनाथ शेनॉय, विशाल शेटे, मनोज वाघमारे, शिक्षक, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कल्याण पूर्व वाहतूक विभाग पोलिस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर आणि त्यांच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गानेही या अभियानात सहभाग घेतला. या वेळी ज्या अधिकारी आणि अंमलदार यांनी २०२२ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे, त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी रस्ते सुरक्षा आणि वाहतुकीचे नियम यावर अधिकारी वर्गाने मार्गदर्शन केले.