पालघर जिल्हा पतंग महोत्सवासाठी सज्ज

पालघर जिल्हा पतंग महोत्सवासाठी सज्ज

वसई, ता. १२ (बातमीदार) : मकर संक्रांतीचा उत्सव साजरा करण्यासाठी पालघर जिल्हा सज्ज झाला आहे. ठिकठिकाणी बाजारपेठा पतंग, तिळगूळ व अन्य साहित्याने फुलून गेल्या असून नागरिकांची गर्दी होत आहे. तीळ आणि गूळ याचे थंडीत असणारे महत्त्व सांगणारा हा सण वसईत मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
पालघर ते वसई-विरार शहरातील व्यापाऱ्यांनी गुजरात येथील अहमदाबाद, जोधपूर, राजस्थान, मथुरा यांसह विविध भागांतून पतंग विक्रीसाठी आणले आहेत. संक्रांतीअगोदरच लहान मुले पतंग उंच आकाशात उडविण्याचा आनंद घेत आहेत; तर पतंग विक्री करण्यासाठी अनेक विक्रेत्यांनी मंडप लावले आहेत. पालघर, बोईसर, डहाणू, वसई, विरार, विक्रमगड, जव्हार, तलासरीसह जिल्ह्यात तिळगूळ तयार करण्याची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. एकमेकांचे पतंग कापण्यासाठी नागरिक आतुर झाले आहेत.
लहान मुलांना आकर्षित करणारे कार्टून, आवडते अभिनेते, तसेच विविधरंगी पतंग बाजारात उपलब्ध झाले आहेत. दुकानदारांनी यंदा माल अधिक मागविला असून विक्री होण्याची आशा आहे. सध्या सहा रुपयांपासून ते ५००-६०० रुपयांपर्यंत पतंग विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
---------------------
महिला बचत गटाला रोजगार
संक्रांतीनिमित्त तिळगूळ विक्री होत असते. त्यामुळे पालघर ग्रामीणसह वसई-विरार शहरातील महिला बचत गटाने तिळगूळ तयार केले असून त्याची विक्री करण्यासाठी समाज माध्यमांचा, तसेच गृहसंकुलात अधिकाधिक वापर केला आहे. तसेच दुकानदारांनाही मागणीप्रमाणे पुरवठा केला जात आहे. त्यामुळे महिलांना रोजगाराचे साधन निर्माण झाले आहे.
-----------------------
खबरदार चायना मांजा वापराल तर
वसई-विरार महापालिकेने चायना मांजा नागरिकांनी वापरू नये म्हणून आदेश काढले. याबाबत समाजमाध्यम, तसेच शहरात फलक लावून जनजागृती केली आहे. होलसेल विक्रेत्यांनादेखील याबाबत तंबी देण्यात आली आहे. यासाठी शहरात पथक कार्यरत राहणार असून नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले तर कारवाई केली जाईल, असे उपायुक्त डॉ. सागर घोलप यांनी स्पष्ट केले आहे.
---------------------
पक्षीप्रेमींचे आवाहन
सार्वजनिक ठिकाणी, गृहसंकुलांच्या टेरेसवर पतंग उडवले जातात. मात्र ते अनेक ठिकाणी अडकून राहतात. त्यांना असलेल्या मांजामुळे पक्ष्यांना इजा पोहचते. त्यामुळे पतंग उडवताना पक्ष्यांची काळजी घ्या, जखमी झाल्यास त्यांच्यावर उपचाराची व्यवस्था करा, असे आवाहन पक्षीप्रेमींकडून केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com