
महावितरणच्या भरारी पथकावर हल्ला
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १२ : कल्याण पूर्वेतील काकडवाल गावात बुधवारी दुपारी मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरणच्या भरारी पथकावर जीवघेणा हल्ला झाला. या घटनेनंतर महावितरणने मलंगगड पट्ट्यातील वीजपुरवठा बंद केला. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मलंगगड भागाचा वीजपुरवठा सुरळीत करणार नाही, असा निश्चय महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केला होता. अखेर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेत जनतेला भेटीवेठीस धरू नका, चुकी कोणाची अन् शिक्षा कुणाला देत आहेत? असा सवाल उपस्थित करत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. त्यानंतर १० तासाने या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
कल्याण पूर्व भागात असलेल्या मलंगगड भागात महावितरणची सर्वाधिक वीज चोरी होत आहे. वीज चोरीला आळा बसावा यासाठी महावितरणकडून गावागावात वीज मीटरची तपासणी केली जात आहे. वीज चोरीच्या प्रकरणी महावितरणकडून उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात शेकडो गुन्हे दाखल आहेत. मात्र असे असतानाही ग्रामीण भागात वीजचोरीचे प्रमाण हे वाढत चालले असल्याने भरारी पथकांद्वारे वीज मीटरची तपासणी केली जात आहे. ही तपासणी करत असताना काकडवाल गावात महावितरणच्या कार्यकारी अभियंता सह अन्य पाच जणांना जबर मारहाण करण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल दहा तास मलंगगड भाग हा अंधारात ठेवला होता. त्यामुळे जनतेला वेठीस धरू नका यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. यानंतर बुधवारी रात्री नऊ वाजता वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.